#अतिरेकी

Showing of 261 - 267 from 267 results
पाठलाग दहशतवादाचा... भाग 3

May 13, 2013

पाठलाग दहशतवादाचा... भाग 3

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे जगभरात पडसाद उमटले. तब्बल 59 तासांकरता दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस ठेवली. भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा हा भ्याड दहशतवादी हल्ला. पण हा हल्ला आपण रोखू शकलो असतो. 26 नोव्हेंबरला कथित पाकिस्तानी शस्त्रधारींनी मुंबईत बोटीतून प्रवेश केला. 184 जणांची हत्या तर तीनशेच्यावर जखमी झाले. 59 तासांत मुंबईत जे काही घडलं ते सगळं कागदोपत्री उपलब्ध आहे. पण तरीही प्रश्न उरतोच की त्यापूर्वी काय घडलं ? अतिरेक्यांनी मुंबईत नक्की प्रवेश कसा केला ? ते आले कुठुन ? मुंबई आणि भारत किती सुरक्षित आहे ? 26 / 11 च्या हल्ल्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे हल्लेखोर पाकिस्तानातून आले. जिवंत पकडलेल्या मोहम्मद अजमल अमीर कसाब या अतिरेक्यानंच तसं कबूल केलंय. ते अल- हुसेनी नावाच्या बोटीतून 23 नोव्हेेंबरला कराचीहुन मुंबईला निघाले. भारतीय समुद्रात प्रवेश केल्यावर त्यांनी पोरबंदरमध्ये मासेमारी करणार्‍या कुबेर नावाच्या बोटीचं अपहरण केलं आणि बोटीच्या कप्तानाला आणि बोटीवरच्या इतर चौघांना ठार मारण्यात आलं. मुंबईपासुन पाच किलोमीटरवर आल्यावर अतिरेक्यांनी कुबेर सोडून दिली आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी रबर डिंगीचा वापर केला. सहाजण कफ परेडजवळच्या बधवार पार्कजवळ समुद्रकिनार्‍याजवळ उतरले तर इतर चार जण ससून डॉकपर्यंत गेले. त्यानंतर त्या दहाजणांनी दोन- दोनचे पाच ग्रुप करुन टॅक्सी पकडल्या आणि तिथून सुरु झालं, त्यांचं मिशन...समुद्रकिनार्‍यावर दहशतवाद्यांना उतरताना एकानं त्यानं पाहिलं होतं. ' तेव्हा नऊ वाजुन दहा मिनिटं झाली असावीत. मी नुकताच जेवण संपवून समुद्रकिनारी येऊन बसलो होतो. मी पाहिलं की, दहा तरुण मुलं एका डिंगीतुन येताहेत आणि त्यांच्या पाठीवर वजनदार हॅवर सॅक होत्या. मी त्यांची चौकशी केली की ते कुठे चाललेत तर त्यांच्यापैकी एकानं मला माझं काम करायला सांगितलं ', असं प्रत्यक्षदर्शी भारत काशिनाथ तांडेल यांनी सांगितलं. अतिरेक्यांनी वापरलेली कोळ्यांची ओळखपत्रं पोरबंदरहून इश्यू करण्यात आली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. ही ओळखपत्र मुख्यत: सीमाशुल्क विभागाकडून दिली जातात आणि त्याची तपासणी मत्स्य विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून केली जाते. ही ओळखपत्र खरी असतील तर ती वाढत्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवतात. पोरबंदरमधल्या कोळ्यांच्या संघटनेनं मात्र सुरक्षित पवित्रा घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार ओळखपत्र खोटी असू शकतात. ' तसं काही झालेलं नाहीय. पण सीमाशुल्क विभाग चौकशी करु शकतो ', असं पोरबंदर बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जीवन जुंगी यांचं म्हणणं आहे. ' बनावट गोष्टी कशाही बनू शकतात. जर नोटा बनावट असू शकतात तर मग ओळखपत्र का नाही ? असा सवाल नॅशनल फिश वर्क फोरमचे सचिव मनीष लोढारी यांनी सांगितलं. याबद्दल मांडवी बंदर प्राधिकरणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली. पण पोरबंदर पोलिसांकडे अशा बनावट ओळखपत्रांबद्दल अजुनपर्यंत कोणतीही माहिती नाही. अतिरेक्यांनी या यंत्रणेचा वापर केल्याचं मत्स्यविभागाने मान्य केलंय. ' हे शक्य आहे. समुद्रात जाणार्‍यांचे फोटो आणि ओळखपत्र सीमाशुल्क विभाग तपासतं. त्यामुळे गैरवापर निश्चितच होऊ शकतो. गुप्त कोड केवळ सीमाशुल्क विभागाकडे आहेत ', असं पोरबंदर मत्स्यविभाग अधीक्षक पी. सी .मलई यांनी सांगितलं.अधिकारी आणि पोलिसांचा भ्रष्टाचार हा भारताच्या सुरक्षिततेला सगळ्यात मोठा धोका आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं .अतिरेक्यांकडे मच्छिमारांची ओळखपत्र होती, हे अधिकार्‍यांना मान्य नाही. पण हा पुराव्यांचा केवळ एक छोटा तुकडा आहे.ओळखपत्र हीच केवळ त्रुटी नाही. अतिरेक्यांना पोहचण्याआधीच पकडता आलं असतं. मुंबईवर हल्ला होण्याच्या आधी तीन दिवस गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाने ' कुबेर ' या बोटीची तपासणी केली होती. त्यावेळी बोटीवर अतिरेकी आपल्या शस्त्र आणि स्फोटक साठयासकट बोटीवर होते. तटरक्षक दलाकडून त्यांची कागदपत्रं कसून तपासण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणेला समुद्रामार्गे होणार्‍या हल्ल्याचा इशारा उशिरात उशिरा म्हणजे 19 नोव्हेंबरला मिळाला होता. ' कोस्ट गार्डनं गुजरातच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात बोटी ठेवल्या होत्या. शिवाय नेव्हीच्यापण बोटी होत्या ', नेव्हल स्टाफ चीफ अ‍ॅडमिरल सुरेश मेहता यांनी सांगितलं. मच्छिमार संघटनेनं तटरक्षक दलातल्या भ्रष्टाचारावर जाहीरपणे टीका केलीय आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे नेव्हीनंही मान्य के लंय की गुप्तचर यंत्रणाही या घटनेचं गांर्भीय पोहचवण्यात अपयशी ठरली. गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय. खरंच गुप्तचर संघटना कार्यरत असत्या तर नेहमीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यांच्या मिटींगमध्ये स्टाफ कमिटीच्या प्रमुखांना याची माहिती दिली गेली असती. या मिटींग्जना रॉ आणि आयबीचे अधिकारीसुद्धा हजर असतात. हे उघड झालं की हे होत नव्हतं. आणखी एका इशार्‍याकडे दुर्लक्ष केलं गेलं. हा इशारा समुद्राकडुनच मिळाला होता. कुबेर बोटीवर ठार मारण्यात आलेल्या मच्छीमारांचे मृतदेह झाकाऊ किनार्‍याजवळ स्थानिक मच्छिमारांना मिळाले होते. पोरबंदरच्या मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष जीवन जुंगी यांनीच ही माहिती तटरक्षक दलाला दिली होती.' आम्ही कोस्ट गार्डला हे सांगितलं होतं की, 20 आणि 21 नोव्हेंबरला झाकाऊजवळ एका बोटीमध्ये एक मृतदेह मिळाला. मच्छिमारांनी हेही सांगितलं की समुद्रात आणखी दोन मृतदेहही मिळालेत ', असं पोरबंदर बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जीवन जुंगी यांनी सांगितलं. पण ही माहिती गुप्तचर संस्थांपर्यंत पोहोचू शकली नाही. पोरबंदर पोलिसांकडे तर याबद्दल अजुनही अधिकृत माहिती नाही. दहशतवादी समुद्रमार्गानं मुंबईत आले. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत वापरण्यात आलेली स्फोटकं कोकणातील शेखाडी बंदरात उतरवण्यात आली होती. 15 वर्षांनंतर दहशतवाद्यांनी पुन्हा सागरी मार्गाचा वापर केला. मागील चुकांपासून कुठलाही धडा घेतलेला नसल्याचं यावरुन सिद्ध होतंय. दोन वर्षापूर्वी सीएनएन-आयबीएननं राज्यातील किनार्‍यांच्या सुरक्षेचा पर्दाफाश केला होता. ' ऑपरेशन वॉटर रॅट ' फेब्रुवारी 2006 मध्ये क रण्यात आलं. जवळपास अडीच वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात कारवाई करताना फारसं गांभीर्य नव्हतं. 26 नोव्हेंबरला हल्ला करणार्‍यांनी तोच रस्ता वापरला. यावरुन हेच उघड होतंय की आपल्या सुरक्षा यंत्रणांनी जुन्या घटनांपासून धडा घेतलेला नाही. पाकिस्तानी अतिरेक्यांची संघटना मुंबई हल्ल्यामागे आहे का ? हे अतिरेकी लष्कर ए तोयब्बाचे हस्तक असल्याचे पुरावे मिळालेयत तसंच त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीनं हे हल्ले केले, असं भारत सरकारनं म्हटलंय. सीएनएन-आयबीएनकडे असे अनेक चौकशी पुरावे आहेत. ज्यात पाकिस्तानचा नि:संशय हात असल्याचंच स्पष्ट होतंय. हल्ल्यानंतर दोन दिवसांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये या हल्ल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली होती. डेक्कन मुजाहिदीन असं त्या संघटनेचं नाव होतं. याचा तपास करणार्‍या सूत्रांनी हे सीएनएन-आयबीएनला सांगितलंय. या संघटनेचा ई-मेल आयडी www. yandex.ru या रशियन वेबसाईटवर तयार झाला होता.आयडीचा अकाऊंट लाहोरमधून वापरला जात होता आणि ई- मेलमध्ये जोडलेली डॉक्युमेंट फाईल बुधवारी सकाळी जोडण्यात आली होती. तपासाअंती आयपी अ‍ॅड्रेसमधून ही माहिती मिळाली. व्हॉईस रेकग्निशन सॉफ्टवेअरच्या मदतीनं हा मेल तयार करण्यात आला होता. जाणकारांच्या म्हणण्यानुसार मजकूर मोठ्याने वाचावा लागतो आणि त्यानंतर सॉफ्टवेअरच्यामदतीनं त्याचं रुपांतर देवनागरी भाषेत केलं जातं. यामुळे मेलच्या भाषेत अनेक चुका रहातात. अतिरेक्यांनी पाठवलेल्या ई- मेलच्या बाबतीत लक्षात येतं की, वापरणार्‍याला हिंदी येत नसावं. गुप्तचर अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार या दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना त्यांना फेब्रुवारीतच मिळाली होती. पाकिस्तानमधल्या लष्कर ठाण्यांवर सॅटेलाईटद्वारे भारतातून अनेक फोन केले गेल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून लष्करच्या तीन हस्तकांना अटक केली. पकडलेल्यांपैकी फहीम अहमद अन्सारीनं पोलिसांसमोर कबूल केलं की, त्यानं मुंबईत ताज आणि ट्रायडंट हॉटेलसह छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची डिसेंबर 2007 मध्ये पाहणी केली होती. त्याने नकाशेही तयार केले. त्यात रस्त्यांची माहिती आणि लोकांच्या येण्याजाण्याच्या वेळांची माहिती होती. अन्सारीनं सांगितलं की त्याच्या अटकेपूर्वी त्यानं लष्करच्या कमांडर ऑफिसर मोहम्मद मुझम्मिलला सगळे प्लॅन दिले होते. त्याला हेही सांगण्यात आलं होतं की, समुद्राजवळ सुरक्षित घरांची सोय करावी.हल्ला करणार्‍यांपैकी एकमेव जिंवत असलेला दहशतवादी मोहम्मद अजमल अमिर कसाबनं लष्कर ए तोयबाचा हात असल्याचं कबूल केलंय. अजमलनं तपास अधिकार्‍यांना सांगितलं की त्याचा जन्म 1987 मध्ये पंजाब प्रांतात झाला होता. त्यानं 2007 मध्ये लष्कर ए तोयब्बाची मूळ राजकीय संघटना ' जमात- उल-दावा ' त भाग घेतला. त्याला काश्मिरमध्ये चाललेल्या अत्याचारांची फिल्म दाखवण्यात आली आणि तिथेच त्याला युद्धाचं आणि समुद्री प्रशिक्षण देण्यात आलं. पाकव्याप्त काश्मिरमध्ये उम्मा अल् क्वारा मनशेरा आणि मंगाला कॅम्पमध्ये त्यानं एक वर्ष ट्रेनिंग घेतलं. लष्करच्या मिलटरी प्रमुखानं त्याला कबूल केलं की त्याच्या समर्पणाबदल्यात त्याच्या कुटुंबाला दीड लाख रुपये दिले जातील. अजमल म्हणाला की, ज्या टीमनं मुंबईवर हल्ला केला त्यांना जीपीएस दिशादर्शक आणि गुगल अर्थचे मॅप सीडीवर देण्यात आले होते. राज्य आणि केंद्र सरकारला या अतिरेकी हल्ल्याविषयी वेगवेगळ्या सूत्रांकडुन माहिती मिळाली होती. अमेरिकन गुप्तचर संघटनांनी ' रॉ ' ला 18 सप्टेंबरलाच सांगितलं होतं की, लिट्टे मुंबईत हल्ला करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका आठवड्याआतच सीआयए या संघटनेनं लष्कर अशा ठिकाणांवर हल्ला करणार असल्याचं सांगितलं होतं. जिथे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. ताज हॉटेलचाही उल्लेख करण्यात आला होता. पाकिस्तानमधल्या लष्करच्या ठाण्यांवरुन अनेक फोन कॉल ट्रेस करण्यात आले तेव्हा गुप्तचर संघटनांनी पुन्हा एकदा 19 नोव्हेंबरला इशारा दिला. त्या कॉलच्या संभाषणातून असं लक्षात आलं की, काही माल उतरवण्यात आलाय आणि 24 नोव्हेंबरला म्हणजे अतिरेकी हल्ला होण्याच्या दोन दिवसआधी याच हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी व्यक्तिश: प्रमुख फाईव्ह स्टार हॉटेलच्या मॅनेजमेंटना येऊ घातलेल्या हल्ल्याबद्दल माहिती दिली होती. सरकारनं हे मान्य केलंय की त्यांनी चुका केल्यात. पण याच चुकांनी मुंबई अधिक असुरक्षित बनली. पण अनेक शहरात ठोस कृतीची मागणी वाढतेय आणि यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Live TV

News18 Lokmat
close