मुंबई, 18 डिसेंबर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) लवकरच मैदानात पुनरागमन करणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज (UKC) स्पर्धेत युवराज खेळणार आहे. युकेसी स्पर्धेमध्ये युवराजशिवाय केव्हिन पीटरसन, राशिद खान, इयन मॉर्गन आणि आंद्रे रसेलही खेळणार आहेत.
या स्पर्धेत एकूण 16 मॅच होणार असून प्रत्येक मॅचमध्ये दोन युकेसी दावेदार असतील. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूचा सामना दुसऱ्या खेळाडूशी होईल. मॅचमध्ये 15 बॉलच्या चार इनिंग असतील. लीग स्टेजमध्ये मॅच जिंकल्यानंतर दोन पॉईंट्स मिळतील, तर सर्वाधिक रन करणारा खेळाडू विजेता असेल. लीग स्टेजमधल्या 4 टीम सेमी फायनलला पोहोचतील.
बॅटिंग करताना युकेसी कंटेंडरला रन काढण्यासाठी धावावं लागेल. स्कोअर 6 झोनमध्ये विभाजित केले जातील. यामध्ये झोन ए साठी एक रन, झोन बी साठी एक रन, झोन सीसाठी दोन रन, झोन डी साठी तीन रन, झोन ईसाठी चार रन आणि झोन ईसाठी सहा रन मिळतील. जर बॅट्समन बॉलरच्या डोक्यावरून बॉल मारू शकला, तर त्याला 12 रन दिले जातील, तसंच एक बॉल जास्तही खेळायला मिळेल. बॅट्समन आऊट झाल्यानंतर एकूण 5 रन कापल्या जातील.
युवराजने या नव्या फॉरमॅटचं स्वागत केलं आणि म्हणाला, 'युकेसी क्रिकेटचं भविष्य आहे, यामुळे प्रेक्षकांचा रोमांचही वाढेल आणि लोकप्रियही होईल. क्रिकेट भारतीयांच्या मनात आहे, पण वेळेनुसार यामध्ये काहीतरी नवीन आणणं गरजेचं आहे. नवीन फॉरमॅट शानदार आहे. युकेसीमध्ये मी 2007 वर्ल्ड कपप्रमाणे एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याचा प्रयत्न करीन.'