• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • हा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजची भविष्यवाणी

हा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजची भविष्यवाणी

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने टीम इंडियाच्या भविष्याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 8 जुलै: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने टीम इंडियाच्या भविष्याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केलं आहे, यामध्ये युवराजचाही समावेश आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, असं युवराज म्हणाला. कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्यामुळे त्याचं कौतुक होत आहे. टीम इंडियामध्ये पदार्पण केल्यानंतरचा पंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. बेजबाबदारपणे विकेट फेकणं आणि अनावश्यक शॉट खेळल्यामुळे अनेकवेळा पंतवर टीका झाली. आयपीएल 2020 मध्येही पंतची कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर मात्र त्याने स्वत:ची प्रतिमा बदलली. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फास्ट बॉलर्सचा त्याने उत्कृष्ट सामना केला आणि त्यांच्यावरच उलट आक्रमण केलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला, या ऐतिहासिक कामगिरीत पंतची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती. 2007 आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकवणाऱ्या युवराजच्या मते ऋषभ पंत आता परिपक्व झाला आहे. 'मी ऋषभ पंतकडे पाहत आहे, त्याला स्वत:ला ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आवडतो, जो आपल्या एकट्याच्या खेळाने मॅचचा निकाल बदलू शकतो. गिलख्रिस्टने टेस्ट क्रिकेटचा खेळच बदलला. मला वाटतं पंतही असं करू शकतो,' असं युवराज टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला. 'ऋषभ पंतकडे मी टीम इंडियाचा संभाव्य कर्णधार म्हणून बघतो. कारण तो मैदानात सक्रीय असतो. तसंच तो टीममधल्या खेळाडूंशी सतत बातचित करत असतो. पंतकडे स्मार्ट डोकं आहे, आयपीएलमध्ये (IPL) दिल्लीचं नेतृत्व करताना त्याने हे दाखवून दिलं, त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्याला मी टीम इंडियाच कर्णधार म्हणून बघत आहे,' अशी प्रतिक्रिया युवराजने दिली. भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. भारतासाठी ही सीरिज महत्त्वाची असणार आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राला भारत याच सीरिजपासून सुरुवात करत आहे.
    Published by:Shreyas
    First published: