मुंबई, 15 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 18 डिसेंबरपासून लुढियानामध्ये पंजाबच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात होणार आहे. युवराजने आधीपासूनच आयएस ब्रिंदा पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली स्टेडियममध्ये सरावाला सुरूवात केली आहे.
युवराजला पंजाबकडून खेळण्याची परवानगी मिळणार का नाही, याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही. मागच्यावर्षी युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो कॅनडामधल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळला. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळायची परवानगी नाही.
प्रविण तांबे याला आयपीएल 2020 साठीच्या लिलावात कोलकात्याने विकत घेतलं होतं. तांबेने 2018 साली निवृत्ती घेतली होती, यानंतर तो युएईतल्या टी-10 लीगमध्ये आणि 2020 साठी कॅरेबियन टी-20 लीगमध्ये खेळला, त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली नाही.
39 वर्षांच्या युवराजला निवृत्तीतून माघार घेण्यासाठी आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी आग्रह केला होता.
View this post on Instagram
'तरुणांसोबत वेळ घालवायला मला आवडतं. यातून मला त्यांना खेळाचे वेगवेगळे पैलू शिकवता येतात. मी सांगतो त्या गोष्टी ते मैदानात वापरातही आणतात,' अशी प्रतिक्रिया युवराजने सप्टेंबर महिन्यात क्रिकबझशी बोलताना दिली.
'नेटमध्ये जाऊन युवा खेळाडूंना काही गोष्टी शिकवायच्या आहेत. मी सांगितलेल्या गोष्टी ही मुलं अमलात आणत आहेत. कित्येक दिवस बॅट हातात न घेताही मी चांगले शॉट मारत आहे, हे पाहून आनंद झाला,' असं युवराज म्हणाला.
'दोन महिने मी ट्रेनिंग केलं आणि मग बॅटिंगला सुरुवात केली. सराव सामन्यातही मी रन केले. यानंतर पुनित बाली यांनी मला निवृत्तीमधून माघार घ्यायला सांगितलं,' असं वक्तव्य युवराजने केलं.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना युवराजने निवृत्तीतून माघार घेण्यासाठीची परवानगी मागितली आहे. 'सुरुवातीला निवृत्तीतून माघार घ्यायची का नाही, या संभ्रमात मी होतो. जगातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पण पुनित बाली यांची विनंतीही मी धुडकावू शकत नव्हतो,' असं युवराज म्हणाला.
पंजाबची संभाव्य 30 खेळाडूंची टीम
मनदीप सिंग, युवराज सिंग, अभिषेक शर्मा, सलिल अरोरा, गितांश खेरा, रमणदीप सिंग, सनवीर सिंग, करन कैला, राहुल शर्मा, क्रिशन अलंग, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग, इकजोत सिंग, नमन धीर, अभिषेक गुप्ता, हिमांशू सत्यवान, गुरुकीरत सिंग, अनमोलप्रीत सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहाल वाढेरा, अनमोल मल्होत्रा, आरुष सभरवाल, अभिनव शर्मा, हरप्रीत ब्रार, मयंक मार्कंडे, बलतेज सिंग, सिद्धार्थ कौल, बरिंदर श्रन, गुरनुर सिंग, हरजस, अभिजीत गर्ग, कुनवर पाठक