नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आगामी आयपीएल 15 सिझनसाठी (IPL2022) काल अनेक बड्या खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे (RCB)प्रतिनिधित्व केलेल्या युझवेंद्र चहलचादेखील (Yuzvendra Chahal) समावेश आहे. रिलीज केल्यानंतर त्याने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बेंगलोर संघाने पुढील हंगामासाठी ३ खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये १ परदेशी खेळाडूचा समावेश आहे. या संघात विराट कोहलीला १५ कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे. तर ग्लेन मॅक्सवेलला ११ आणि मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपये देऊन बेंगलोर संघाने रिटेन केले आहे. पण अनुभवी खेळाडू युझवेंद्र चहलचा पत्ता कट केला आहे.
दरम्यान चहलला रिलीज केल्यामुळे चाहते देखील निराश झाले आहे. बेंगलोर संघाच्या निर्णयानंतर चहलने एक ट्विट केले आहे. ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘प्रत्येक गोष्टीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आभार!!’ अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या ट्विटमुळे क्रिकेट जगतात वेगळीच चर्चा रंगली आहे. त्याने असे ट्विट करन संघावर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे.
Thank you for everything @RCBTweets
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) November 30, 2021
बेंगलोर संघाला आतापर्यंत आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुढील हंगामात हा संघ नवीन खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. चहलबद्दल बोलायचं झालं तर त्याने गेल्या काही वर्षांपासून या संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. चहलने चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली आणि याबद्दल त्याचे खूप कौतुकही झाले होते. आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत त्याने भारतीय संघात देखील स्थान मिळवले होते.
टाइम्स ऑफ इंडियाने आयपीएलच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की युझवेंद्र चहल कायम ठेवलेल्या खेळाडूंचा भाग असणार नाही. त्याच्यात आणि व्यवस्थापनात चर्चाच होत नाही. हे प्रकरण कायम ठेवण्याच्या रकमेवर अडकल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत चहलकडून लिलावात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आयपीएल 2018 मध्ये आरसीबीने कोहलीसह चहलला कायम ठेवले होते.
युझवेंद्र चहल आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. 2011 ते 2013 पर्यंत तो मुंबई संघाचा भाग होता. यानंतर, तो 2014 ते 2021 पर्यंत आरसीबीकडून खेळला आणि प्रत्येक हंगामात तो संघाचा महत्त्वाचा गोलंदाज होता. चहलच्या नावावर 114 आयपीएल सामन्यात 139 विकेट्स आहेत. 25 धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB, Yuzvendra Chahal