पाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ, दोन दिवसात टीम इंग्लंडला जाणार

पाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ, दोन दिवसात टीम इंग्लंडला जाणार

दोनच दिवसात पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, पण त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी पाकिस्तान टीमचा बॅटिंग प्रशिक्षक युनूस खान (Younus Khan) याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून: दोनच दिवसात पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, पण त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी पाकिस्तान टीमचा बॅटिंग प्रशिक्षक युनूस खान (Younus Khan) याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट खेळत असताना युनूस खानची तुलना राहुल द्रविडसोबत (Rahul Dravid) व्हायची, तसंच निवृत्तीनंतरही युनूस खान राहुल द्रविडप्रमाणेच पाकिस्तानमधल्या तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी तयार करेल, यासाठी त्याला प्रशिक्षक बनवण्यात आलं, पण युनूस खानने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पाकिस्तानची टीम 25 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 खेळवण्यात येणार आहेत. यानंतर लगेच पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, तिकडे 2 टेस्ट आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी टीम बॅटिंग प्रशिक्षकाशिवाय जाणार आहे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकाची निवड योग्य वेळी केली जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं. युनूस खान त्याला मिळणाऱ्या भूमिकेमुळे खूश नव्हता, टीम निवड करण्याता त्याला भूमिका घ्यायची होती, पण ज्या पद्धतीने भविष्यासाठी टीम तयार केली जात होती, त्यावरून तो नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

युनूस खानला मागच्या वर्षी नोव्हेंबर 2022 आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. युनूससारखा अनुभवी आणि तज्ज्ञ माणूस टीमसोबत नसणं दु:खद आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी दिली.

युनूस खान हा टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रन करत सर्वाधिक रन असणारा पाकिस्तानचा खेळाडू आहे. 2007 साली पीसीबी अध्यक्षांनी भेटायला वेळ दिली नाही, म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीमचं नेतृत्व करायला नकार दिला होता. 2009 साली टीममधल्या काही खेळाडूंनी युनूस खानविरुद्ध बंड केलं, यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. करियरच्या अखेरच्या टप्प्यात युनूसने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या पुरस्काराची रक्कमही त्याने परत दिली होती, कारण काही अधिकाऱ्यांनी केलेल्या वर्तणुकीवर युनूस खान नाराज होता.

Published by: Shreyas
First published: June 22, 2021, 3:57 PM IST

ताज्या बातम्या