नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : नवी दिल्लीत नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रिकेट खेळताना एका युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बॉल थेट छातीवर आदळल्यानं या खेळाडूचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा तरुण मूळचा कोलकात्याचा असून कोलकात्याहून तो नवी दिल्लीत खेळायला आला होता. ही घटना नवी दिल्लीतल्या स्वरुप नगरची असून तिथल्या स्कूल कॅम्पसमध्ये खेळताना या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
या दुर्दैवी तरुणाचं नाव हबीब मंडल असं आहे. त्याचं वय 30 वर्ष इतकं होतं. वृत्तसंस्थांच्या बातमीनुसार एका सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यावेळी फलंदाजी करताना या युवकाच्या थेट छातीवर बॉल आदळला. त्यानंतर तो मैदानातच बेशुद्ध झाला. त्याला श्वास घेण्यास अडथळा येत होता. हबीबला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हबीब एक उत्कृष्ट क्रिकेटपटू
पोलीस आणि हबीबच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो एक चांगला क्रिकेटर होता. अनेक स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यानं चांगली कामगिरी बजावली होती. दरम्यान कोलकातातल्या त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीसांच्या म्हणण्यानुसार त्याच्या शरीरावर जखम किंवा इतर कोणतेही निशाण नाही. त्याचा मृतदेह नवी दिल्लीतल्या जगजीवन रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मृत्यूचं खरं कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच कळेल.
हेही वाचा - Ind vs Zim: वन डेत शुभमन गिलची गाडी सुसाट... पाहा गेल्या 5 सामन्यातली गिलची कामगिरी
काही दिवसांपूर्वी हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील कलाकार दीपेश भान याचाही क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.