मुंबई, 22 डिसेंबर : सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali t-20 Trophy) पासून जानेवारी महिन्यात भारताच्या स्थानिक क्रिकेटला सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे गेले मार्च महिन्यापासून भारतातलं क्रिकेट बंद होतं. आता सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सगळ्या राज्यांच्या क्रिकेट असोसिएशननी त्यांच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे आणि यासाठीच्या तयारीलाही सुरूवात केली आहे. या स्पर्धेआधी मुंबईच्या टीमने मैदानात बॅटिंग आणि बॉलिंगचा सराव केला.
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने वादळी शतक केलं. यशस्वीने 49 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले. तर सूर्यकुमार यादवने 31 बॉलमध्ये नाबाद 59 रन आणि शिवम दुबेने 23 बॉलमध्ये 49 रनची खेळी केली. सरफराज खानने 31 बॉलमध्ये 40 रन केले.
बॉलिंगमध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन दोन विकेट घेतल्या, तर तुषार देशपांडेला 35 रन देऊन 3 विकेट घेता आल्या.
Cricket is Back !!!! Watch the first over bowled in Mumbai after lock down. @tushard_96 pic.twitter.com/GrSGwOOq4u
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 21, 2020
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा 10 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान सहा टीममध्ये जैव सुरक्षित वातावरणात खेळवली जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीमना 2 जानेवारीपासून जैव सुरक्षित वातावरणात जावं लागणार आहे.
मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजच्या मॅच पूर्ण झाल्यानंतर रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीबाबत निर्णय घेतला जाईल. याशिवाय सदस्यांकडून मतंही मागवली जातील. माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांनुसार बीसीसीआयला फेब्रुवारी महिन्यात आयपीएल (IPL) साठी खेळाडूंचा लिलाव करायचा आहे, म्हणून त्याआधी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवली जात आहे.