मुंबई, 07 फेब्रुवारी: अंडर 19 वर्ल्डकपमध्ये (Under19 World Cup) आपल्या कौशल्याची चमक दाखवलेला भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने अवघ्या 97 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाला गारद करून 142 धावांची धडाकेबाज कामगिरी केली आहे. यावेळी त्याने 18 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद शतक केलं आहे. सध्या विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी मुंबईच्या संघातील खेळाडूंमध्ये निवड सामने खेळवले जात आहेत.
यावेळी 'टीम सी' ने 'टीम ए' ला 14 बाकी असतानाच हरवलं आहे. टीम ए ने पहिल्यांदा फलंदाजी स्विकारत टीम सी समोर 311 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. टीम ए कडून सुजीत नायकने 89, तनुष कोटियान नाबाद 82 आणि आदित्य तारेने 51 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम सी ने ताबोडतोब फलंदाजी कर प्रतिस्पर्धी टीम ए चा धुव्वा उडवला आहे. धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने अवघ्या 97 चेंडूत 18 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद शतक ठोकलं आहे.
या सामन्यात टीम ए कडून अर्जुन तेंडुलकरही खेळत होता. या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई पाहायला मिळाली. त्याने 4.1 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या आहेत. यावेळी अर्जुनने तब्बल 9 वाइड बॉल टाकले. टीम ए ने 311 धावांच लक्ष्य समोर ठेवल्यानंतर यशस्वी जयस्वालने केवळ 97 चेंडूत 142 धावा फटकावल्या आहेत. त्याचवेळी पृथ्वी शॉने 20 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. तर सरफराज खानने 23 चेंडूत आठ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 49 धावा कुटल्या. यामुळे टीम सी संघाने 35.1 षटकांत 311 धावांचे लक्ष्य गाठलं आहे.
मुंबईने यावेळी विजय हजारे ट्रॉफीसाठी 104 संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यासाठी हे सिलेक्शन सामने सुरू आहेत. गेल्या काही काळापासून मुंबई क्रिकेट संघाची कामगिरी खालावली आहे. विजय हजारे ट्रॉफी 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 50 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी ही भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा आहे. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रणजी करंडक रद्द करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news