मुंबई, 5 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) 18-22 जून या कालावधीमध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये होणार आहे. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) आयसीसीची ही ट्रॉफी पटकावण्यासाठी एकमेकांना भिडतील. पण टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मात्र आयसीसीच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. स्पोर्ट्सस्टारसोबत लक्ष्मण बोलत होता.
'माझ्या हिशोबाने परदेशात मिळणाऱ्या विजयासाठी जास्त पॉईंट्स दिले पाहिजे. आयसीसीने या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे. तसंच प्रत्येक टीमला समान मॅच आणि समान सीरिज खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. एखादी टीम जास्त सामने खेळून आणि दुसरी टीम कमी सामने खेळून फायनलला पोहोचत असेल, तर ते चुकीचं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवणं सोपं नाही,' असं लक्ष्मण म्हणाला.
आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यांची संख्या निश्चित केली गेली नाही, पण सीरिज निश्चित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीम 6 सीरिज खेळल्या, यातल्या 3 सीरिज घरच्या मैदानात आणि बाकीच्या 3 सीरिज परदेशात खेळल्या गेल्या. मॅचच्या संख्येच्या आधारावर पॉईंट्स देण्यात आली, पण मॅचची संख्या समान राहिली, तर योग्य आकडे समोर येतील. यावेळी न्यूझीलंडची टीम कमी पॉईंट्स असूनही फायनलमध्ये पोहोचली. विजयी टक्केवारीच्या हिशोबने न्यूझीलंडला फायनल गाठता आली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे, त्यामुळे त्यांचा फायदा होईल, असं लक्ष्मणला वाटतं.
कपिल, गांगुली, धोनीची बरोबरी करणार विराट?
टीम इंडियाने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच 1983 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा भारतीय टीमने मजबूत अशा वेस्ट इंडिजला धूळ चारली होती. यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) कर्णधार असताना भारत 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संयुक्त विजेता बनला होता. पुढे एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. कोहलीने आतापर्यंत 200 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, पण टीमला अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकून विराट कपिल, गांगुली आणि धोनीच्या यादीत जाऊ शकतो.
फायनलसाठी रिझर्व्ह डे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी 23 जूनला रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. निर्धारित 5 दिवसांमध्ये खेळ पूर्ण झाला नाही किंवा ओव्हर फुकट गेल्या तर सहाव्या दिवशी मॅच खेळवली जाईल, पण याचा निर्णय मॅच रेफ्री घेणार आहे. मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. आतापर्यंत फक्त 2002 सालीच भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही टीम संयुक्त विजेत्या झाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india