Home /News /sport /

विराट-रोहित हॉटेलमध्ये 'कैद', इतर खेळाडूंनाही भेटता येणार नाही, कारण...

विराट-रोहित हॉटेलमध्ये 'कैद', इतर खेळाडूंनाही भेटता येणार नाही, कारण...

भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट टीम (Team India) 2 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यासाठी दोन्ही टीम 19 मे रोजीच मुंबईच्या बायो-बबलमध्ये (Bio Bubble) आल्या आहेत.

    मुंबई, 25 मे : भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट टीम (Team India) 2 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यासाठी दोन्ही टीम 19 मे रोजीच मुंबईच्या बायो-बबलमध्ये (Bio Bubble) आल्या आहेत. पण विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे खेळाडू आज म्हणजेच मंगळवारी बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. हे खेळाडू आज बायो-बबलमध्ये आले असल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) त्यांना कठोर नियम लावले आहेत. या खेळाडूंना सहकाऱ्यांना भेटायला किंवा वर्क-आऊट करायला परवानगी देण्यात आलेली नाही. विराटसह इतर सगळ्या खेळाडूंना त्यांच्या खोलीतच कैद राहावं लागणार आहे. हॉटेलच्या खोलीतच त्यांना वर्क आऊट करावं लागेल. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आलं आहे. बायो-बबलमध्ये आज प्रवेश केलेल्या खेळाडूंसाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या खेळाडूंना 7 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागणार आहे. तोपर्यंत त्यांना टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना भेटता येणार नाही. विराट आणि रोहितसह अन्य खेळाडू टीम ज्यादिवशी इंग्लंडला रवाना होईल तेव्हाच टीमशी जोडले जातील, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. विराटसह इतर खेळाडूंसाठी त्यांच्या खोलीतच सायकल, डमबेल्स आणि बारची व्यवस्था करण्यात आली आहे. याचसोबत त्यांची रोज कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. 19 मे रोजी बायो-बबलमध्ये प्रवेश केलेल्या खेळाडूंना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. या खेळाडूंची कोरोना टेस्ट एक दिवसाआड होणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही खेळाडूला सराव करता येणार नाही. शुभमन गिल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अगरवाल, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मिताली राज, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि स्मृती मंधना हे खेळाडू 19 मे रोजीच बायो-बबलमध्ये आले होते. हे खेळाडू दोन आठवडे क्वारंटाईन राहतील. सगळ्या खेळाडूंना त्यांच्या कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येणं बंधनकारक होतं. निगेटिव्ह रिपोर्ट असेल, तरच खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश देण्यात आला. यासाठी बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूची त्याच्या घरी जाऊन आरटी-पीसीआर टेस्ट केली. खेळाडूची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला टीममधून बाहेर केलं जाईल, हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. 2 जून रोजी टीम इंग्लंडला रवाना होईल, यानंतर खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, यात 3 दिवस कठोर क्वारंटाईन तर यानंतर पुढचे 7 दिवस त्यांना सराव करता येणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही खेळाडूंची वारंवार कोरोना टेस्ट करण्यात येईल. तसंच त्यांना तिकडेच कोरोनाचा दुसरा डोस देण्यात येईल. टीम इंडियाच्या बहुतेक सगळ्या खेळाडूंनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवली जाईल, यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. तर भारतीय महिला टीम इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून एक टेस्ट खेळेल, यानंतर 3-3 मॅचची वनडे आणि टी-20 सीरिज खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या