मुंबई, 28 मे : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी लागला आहे. मागच्यावेळी भारताने 2018 साली इंग्लंडचा (India vs England) दौरा केला होता. त्यावेळी 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटने दोन शतकांच्या मदतीने 593 रन केले होते. त्याआधी 2014 साली विराटला 5 टेस्टमध्ये फक्त 134 रनच करता आले होते. यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनलही (World Test Championship Final) इंग्लंडमध्येच खेळणार आहे, त्यामुळे एकूण 6 टेस्टमध्ये विराट मागच्यावेळसारखीच कामगिरी पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना मात्र विराटचा शतकाचा दुष्काळ सुरू असला तरी त्याला रन करता येतील, असा विश्वास आहे. दुसरीकडे त्यांनी विराटला अति-आक्रमकतेपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.
कपिल देव यांनी मिड-डेला मुलाखत दिली. 'मला अपेक्षा आहे, की तो सर्वोत्तम कामगिरी करेल. तुम्ही खरंच त्याला रोखून धरू शकता? तो नैसर्गिक खेळाडू आहे, पण त्याने अति-आक्रमकतेपासून सावध राहावं. त्याने प्रत्येक सत्रानुसार खेळाला समजावं, तसंच त्याने स्वत:च्या वेळेची वाट पाहावी. त्याने जर धैर्य ठेवलं, तर तो रन करू शकतो. इंग्लंडमध्ये लवकर आक्रमक होणं फायद्याचं नाही. तुम्हाला तिकडे बॉल पाहून खेळावं लागतं,' असं कपिल देव म्हणाले. विराटने इंग्लंडमध्ये 10 टेस्ट खेळून 36.35 च्या सरासरीने दोन शतकं आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने 727 रन केले आहेत.
टीम इंडियाला 14 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. राहुल द्रविड (Rahul Dravid) कर्णधार असताना भारताने 2007 साली इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. मागच्या वेळी विराटच्या नेतृत्वात भारताचा 4-1 ने पराभव झाला होता. 2007 आधी 1986 साली भारताने इंग्लंडला कपिल देव यांच्या नेतृत्वात त्यांच्याच मायभूमीत हरवलं होतं. भारतासाठी इंग्लंड दौरा सोपा असणार नाही, कारण इंग्लंडची टीम घरच्या वातावरणात खूप चांगली आहे, असं कपिल देव म्हणाले.
'घरच्या मैदानात इंग्लंडची टीम खूप चांगली आणि मजबूत आहे, पण भारतीय बॉलर कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या खेळपट्टीवर खेळत आहेत, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या परिस्थितीमध्ये स्विंगमुळे खूप फायदा होईल, म्हणून इंग्लंड भारतापेक्षा एक पाऊल पुढे असेल,' असं कपील देव यांना वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Team india, Virat kohli