साऊथम्पटन, 16 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होणार आहे. या मुकाबल्यासाठी न्यूझीलंडचा अनुभवी बॅट्समन रॉस टेलर (Ross Taylor) तयार आहे, पण त्याआधी त्याने मजेशीर खुलासा केला आहे. दोन वर्षांपूर्वीच आपण निवृत्त होण्याचा विचार करत होतो, पण स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे मी तो निर्णय घेतला नाही, असं टेलरने सांगितलं. जर 2019 चा वर्ल्ड कप जिंकलो असतो, तर मी निवृत्तीची घोषणा केली असतं, असा खुलासा टेलरने केला.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातली वर्ल्ड कप फायनल (World Cup 2019) टाय झाली, यानंतर झालेली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, त्यामुळे बाऊंड्री जास्त मारल्याच्या नियमांमुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. आता रॉस टेलरकडे टेस्टचा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.
भारताविरुद्धच्या फायनलआधी टेलर फॉर्ममध्ये आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टेलरने 80 रनची खेळी केली. न्यूझीलंडने हा सामना 8 विकेटने जिंकला. आता रॉस टेलरच्या टीमला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. टीम इंडिया खूप मजबूत असल्याचं टेलरने मान्य केलं आहे. भारताकडे उत्कृष्ट बॅट्समन आणि बॉलर असल्याचं टेलरने सांगितलं.
न्यूझीलंडची टीम जर फायनल जिंकली तर टेलर क्रिकेटला अलविदा करणार का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा विकेटकीपर बीजे वॉटलिंग (BJ Watling) याने आधीच ही टेस्ट आपली अखेरची असेल असं स्पष्ट केलं आहे. वॉटलिंगची ही 75 वी आणि अखेरची टेस्ट असेल. कंबरेच्या दुखापतीमुळे वॉटलिंग मागच्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध झालेली दुसरी टेस्ट खेळला नव्हता. वॉटलिंगने 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india