मुंबई, 16 जून : न्यूझीलंडचा माजी फास्ट बॉलर शेन बॉण्डने (Shane Bond) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) यांच्याबाबत मजेशीर खुलासा केला आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा भारताकडून ओपनिंगला बॅटिंग करेल, तर बोल्ट न्यूझीलंडच्या बॉलिंग आक्रमणाचं नेतृत्व करेल. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळतात, तर शेन बॉण्ड मुंबईचा बॉलिंग प्रशिक्षक आहे.
बोल्ट आणि रोहित शर्मा यांच्यात आयपीएलदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत चर्चा झाली होती, असं बॉण्ड म्हणाला. तो स्टार स्पोर्ट्सच्या व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होता, त्यावेळी त्याने मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान झालेला एक किस्सा सांगितला.
आयपीएलमध्ये सराव करताना बोल्ट रोहितच्या पायावर बॉल मारत होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही असंच होणार आहे, असं बोल्टने रोहितला सांगितल्याचं बॉण्ड म्हणाला.
शेन बॉण्डने रोहित शर्माचंही कौतुक केलं आहे. 'एक खेळाडू म्हणून मी रोहितवर प्रेम करतो. तो मॅथ्यू हेडनसारखा खेळाडू आहे, जो स्वत:चा दिवस असेल, तर जगातल्या कोणत्याही टीमविरुद्ध रन करू शकतो. इंग्लंडविरुद्ध कठीण खेळपट्टीवर त्याने रन केले. तो स्वत:ला सिद्ध करतो. तो आणि ऋषभ पंत खूप लवकर विरोधी टीमच्या हातातून विजय खेचून आणू शकतात,' अशी प्रतिक्रिया शेन बॉण्डने दिली.
'काही भागांमध्ये न्यूझीलंड भारतावर भारी पडू शकते, पण रोहित जलद रन करतो, जर त्याने फायनलमध्येही असंच केलं तर विरोधी बॉलरवर दबाव वाढेल. रोहित आणि बोल्टमधली स्पर्धा रोमांचक होईल,' असा अंदाज बॉण्डने व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl, Mumbai Indians, New zealand, Rohit sharma, Team india