मुंबई, 14 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवण्यात येणार आहे. साऊथम्पटनच्या एजेस बाऊलमध्ये हा मुकाबला रंगेल. टेस्ट क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी 2019 पासून या स्पर्धेला आयसीसीने सुरुवात केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर राहिली. भारताने या स्पर्धेत 12 टेस्ट जिंकल्या तर 4 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि एक मॅच ड्रॉ झाली. भारताच्या खात्यात 520 पॉईंट्स आणि 72.2 टक्के विजय होते. तर न्यूझीलंडने 7 सामने जिंकली आणि 4 मध्ये त्यांचा पराभव झाला. न्यूझीलंडचे पॉईंट्स 420 होते आणि 70 टक्के विजय होते.
18-22 जूनदरम्यान ही फायनल रंगणार असली तरी 23 जूनला रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. जर फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या टीमने इंग्लंडचा टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने पराभव केला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावलेला असेल. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही या विजयामुळे फायनलमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड असेल, कारण त्यांना मॅच प्रॅक्टिस मिळाल्याचं म्हणलं आहे.
दुसरीकडे भारतीय टीम इंग्लंडमध्ये 3 जून रोजी पोहोचली. यानंतर त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं. हा कालावधी संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंट्रा स्क्वॉड सामना खेळला, यानंतर आता भारतीय टीम थेट न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठीच मैदानात उतरेल.
भारतात कोणत्या चॅनलवर दिसणार लाईव्ह मॅच?
भारतामध्ये तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना पाहता येईल.
न्यूझीलंडमध्ये कुठे दिसणार लाईव्ह?
न्यूझीलंडमध्ये स्काय स्पोर्ट्स-2 वर या मॅचचं लाईव्ह प्रसारण पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?
या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) VIP ग्राहकांसाठी Disney+ Hotstar वर आणि Jio TV वर उपलब्ध असेल.
याशिवाय न्यूझीलंडमधले दर्शक हा सामना स्काय स्पोर्ट्स नाऊ आणि स्काय गो ऍपवर पाहू शकतात.
कधी सुरू होणार सामना?
भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामना इंग्लंडमधल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल, त्यावेळी भारतात दुपारचे 3 आणि न्यूझीलंडमध्ये रात्रीचे 9.30 वाजले असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india