साऊथम्पटन, 14 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा मुकाबला रंगणार आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलरना अनुकूल मानल्या जातात, त्यामुळे फायनलसाठीची खेळपट्टीही तशीच असेल. या सामन्यात न्यूझीलंडचा आत्मविश्वास थोडा जास्त असेल, कारण त्यांनी इंग्लंडचा अशाच खेळपट्टीवर पराभव केला आहे. आयसीसीकडून पहिल्यांचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष या फायनलकडे लागलं आहे.
साऊथम्पटनचे पिच क्युरेटर सिमोन ली यांनी खेळपट्टीबाबत क्रिकइन्फोसोबत बातचित केली. खेळपट्टीवर उसळी आणि वेग असेल, कारण माझी स्वत:ची तशी इच्छा असते. इंग्लंडमध्ये मात्र अशी खेळपट्टी तयार करणे आव्हानात्मक असते, कारण इथलं वातावरण बहुतेकवेळा खराब असतं, असं ली म्हणाले. हवामानाचा अंदाज चांगला आहे, या दिवसांमध्ये उन्ह असेल, त्यामुळे वेग आणि उसळी असणारी खेळपट्टी बनवण्यात आम्ही यशस्वी होऊ, असं ली यांना वाटतं.
'लाल बॉल क्रिकेटला रोमांचक बनवतो, मी देखील एक क्रिकेट चाहता आहे, त्यामुळे मी अशी खेळपट्टी बनवेन, जिकडे चाहत्याला प्रत्येक बॉल बघावा लागेल. चांगली बॅटिंग असो किंवा शानदार बॉलिंग स्पेल असो. जर बॅट्समन आणि बॉलरमध्ये चांगली स्पर्धा झाली तर सामना रोमांचक होतो. खेळपट्टीवर वेग आणि उसळी असली तरी फक्त फास्ट बॉलरनाच फायदा होणार नाही,' असं ली यांनी स्पष्ट केलं.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार साऊथम्पटनमध्ये सगळे पाच दिवस तापमान 20 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल, तसंच हलक्या पावसाचाही अंदाज आहे. जर हवा कोरडी असेल तर शेवटचे दोन दिवस स्पिन बॉलर महत्त्वाचे ठरतील, असं ली यांनी सांगितलं. इथली खेळपट्टी लवकर सुकते कारण, मातीमध्ये रेतीही असते. आम्हाला अशी खेळपट्टी बनवायची आहे, जिकडे सगळ्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, असं वक्तव्य ली यांनी केलं.
'टीम इंडियाचे खेळाडू जेव्हा इकडे पोहोचले तेव्हा ते बालकनीमधून पाहत होते, कारण त्यावेळी त्यांचा क्वारंटाईन कालावधी सुरू होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मला फोन केला. फोनवर त्यांनी मला माझ्या कुत्र्याचं नावही विचारलं. माझा कुत्रा विंस्टन माझ्यासोबत मैदानातही असतो,' अशी प्रतिक्रिया ली यांनी दिली. प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आग्रही असतील. विराटलाही (Virat Kohli) अजूनपर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india