आकाश चोप्रा म्हणतो, WTC Final मध्ये भारताला जाणवतेय या खेळाडूची कमी

आकाश चोप्रा म्हणतो, WTC Final मध्ये भारताला जाणवतेय या खेळाडूची कमी

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) पावासने खूप त्रास दिला.

  • Share this:

साऊथम्पटन, 22 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) पावासने खूप त्रास दिला. चार दिवसांपैकी दोन दिवसांचा खेळ तर होऊच शकला नाही आणि उरलेल्या दोन दिवसांमध्येही खराब प्रकाशामुळे ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत. भारतीय टीमच्या बॉलरनाही या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. न्यूझीलंडच्या फक्त दोन विकेट घेण्यातच भारतीय बॉलरना यश आलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने भारतीय टीम भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) मिस करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

31 वर्षांचा भुवनेश्वर कुमार बॉल दोन्ही बाजूंना स्विंग करू शकतो आणि इंग्लंडमधल्या या वातावरणात भुवनेश्वर नक्कीच यशस्वी ठरला असता, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. न्यूझीलंडच्या स्विंग बॉलरनीही भारताला या सामन्यात बराच त्रास दिला.

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'भारताला भुवनेश्वरची कमी जाणवत आहे. भुवी नव्या बॉलने स्विंग करू शकतो, तसंच तो मोठे स्पेलही टाकू शकतो आणि त्याला बॅटिंगही येते. भुवनेश्वर कुमार टीमसाठी सगळं करू शकतो. न्यूझीलंडचे बॉलर चांगल्या ऍक्शनमुळे बॉल स्विंग करू शकतात. न्यूझीलंडच्या चार फास्ट बॉलरपेक्षा कॉलिन डि ग्रॅण्डहोमचा बॉल जास्त स्विंग झाला. भारताकडून फक्त इशांत शर्मालाच (Ishant Sharma) स्विंग मिळाला. शमी (Mohammad Shami) आणि बुमराह (Jasprit Bumrah) स्विंग करू शकले नाहीत.'

'स्विंगचा उपयोग तेव्हाच करता येईल जेव्हा बॉल तुमच्या हातातून सुटेल. कॉलिन डि ग्रॅण्डहोमला स्विंग मिळाला, साऊदी आणि जेमिसनही जवळपास होते, पण शमी आणि बुमराहला स्विंग मिळाला नाही, कारण ते सीम बॉलर आहेत,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं.

न्यूझीलंडचे माजी फास्ट बॉलर सायमन डूल (Simon Doull) यांनीही भारतीय बॉलरची कमजोरी सांगितली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे सीम बॉलर आहेत, तर इशांत शर्मा हा गेल्या काही काळापासून बॉल स्विंग करायला लागला आहे. भारताकडे सीम बॉलर आहेत, तर न्यूझीलंडकडे स्विंग बॉलर आहेत, त्यामुळे किवी बॉलर यशस्वी ठरल्याचं डूल म्हणाले.

Published by: Shreyas
First published: June 22, 2021, 5:27 PM IST

ताज्या बातम्या