मुंबई, 22 मे : अनुभवी विकेट कीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने आयपीएलच्या (IPL 2021) बायो-बबलवर (Bio Bubble) प्रश्न उपस्थित केले आहेत. बायो-बबलवर टीका करणारा ऋद्धीमान साहा हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे. भारतात तयार करण्यात आलेला बायो-बबल युएईच्या (UAE) तुलनेत अभेद्य नव्हता, असं साहा म्हणाला आहे. आयपीएलदरम्यान कोरोना (Corona Virus) झालेल्या खेळाडूंपैकी ऋद्धीमान साहा एक आहे. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची लागण झाली, यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पीटीआयला मुलाखत देताना साहा म्हणाला, 'आयपीएल युएईमध्येच झाली असती तर चांगलं झालं असतं. याबाबतचा निर्णय घेणं संबंधितांचं काम आहे, पण मागच्यावेळी युएईमध्ये आयपीएल झाली, तेव्हा तिकडे ट्रेनिंगसाठी एकही व्यक्ती उपस्थित नव्हती, मैदानाचे कर्मचारीही नाही.'
'भारतामध्ये सरावादरम्यान लोकं उपस्थित असायची. मुलं भितींवरून पाहायची. मी जास्त टिप्पणी करणार नाही, पण 2020 सालची आयपीएल आरामात झाली, पण भारतात स्पर्धा सुरू झाली तेव्हा रुग्ण वाढले,' असं वक्तव्य साहाने केलं. दिल्लीच्या हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर साहा त्याच्या कोलकात्याच्या घरी गेला. यानंतर आता तो इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत (India vs England) जाणार आहे.
'मी पूर्णपणे बरा झालो आहे, मला अशक्तपणाही वाटत नाही. पण मी सराव करेन, तेव्हाच माझं शरीर कशी प्रतिक्रिया देतंय ते कळेल. कोरोनाची लागण झाल्यानंतर थोडा ताप होता, यानंतर पुढचे पाच दिवस मला कशाचाही वास येत नव्हता,' असं साहाने सांगितलं.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.