मुंबई, 20 जानेवारी : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची मान उंचावून पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटूंनी सध्या भारतीय कुस्ती महासंघा विरोधात आंदोलन पुकारले आहे. बुधवार 18 जानेवारी पासून दिल्ली येथील जंतरमंतरवर भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाट हिने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. तसेच बृजभूषण सिंह हे कुस्तीपटूंचे मानसिक छळ करतात असा आरोप देखील इतर कुस्तीपटुंकडून करण्यात आला आहे. तब्बल 30 कुस्तूपटू या आंदोलनात सहभागी झाले असून या आंदोलनाला क्रीडा विश्वातून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर सरकार देखील खडबडुन जाग झालं असून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील खेळाडूंची भेट घेतली आहे. परंतु खेळाडूंनी प्रशिक्षक किंवा फेडरेशनशी संबंधित अधिकाऱ्यांवर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भारतीय क्रीडा विश्वात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात आली, तर काही प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सिद्ध झाले. कोणती होती अशी प्रकरणे यावर एक नजर टाकुयात.....
संदीप सिंह प्रकरण:
29 डिसेंबर 2022 रोजी, एका कनिष्ठ प्रशिक्षकाने हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार संदीप सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केले होते. 1 जानेवारी 2023 रोजी, चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरुद्ध ज्युनियर प्रशिक्षकाच्या तक्रारीवरून लैंगिक छळ आणि अवैध संबंधाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. संदीप सिंह यांनी त्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
अॅलेक्स अॅम्ब्रोस प्रकरण :
जुलै 2022 मध्ये, भारताच्या अंडर-17 महिला फुटबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अॅलेक्स अॅम्ब्रोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर सहाय्यक प्रशिक्षक अॅलेक्स अॅम्ब्रोस यांना जुलै 2022 मध्ये पदावरून काढून टाकण्यात आले होते.
महिला सायकलपटू प्रकरण:
जून 2022 मध्ये, स्लोव्हेनियामधील परदेशी प्रशिक्षण शिबिरात एका महिला सायकलपटूने राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आर के शर्मा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला तेव्हा भारतीय सायकलिंग वादात सापडले. 8 जून 2022 रोजी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मुख्य सायकलिंग प्रशिक्षक आर के शर्मा यांचा करार रद्द केला.
ज्युनियर अॅथलीट्स केस:
जून 2018 मध्ये, तामिळनाडूतील सुमारे 15 ज्युनियर अॅथलीट्सनी स्पोर्ट्स भारतीय क्रीडा प्राधिकरण मुख्यालयात तक्रार पाठवली आणि प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणने त्यांच्या तामिळनाडू केंद्रातून प्रशिक्षकाची हकालपट्टी केली. त्याच वर्षी, भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये ज्युनियर अॅथलीट्सच्या लैंगिक छळाच्या गंभीर प्रकरणांसाठी योग्य शिक्षेची मागणी केली.
महिला क्रिकेटपटूचा विनयभंग:
जानेवारी 2020 मध्ये, गौतम गंभीरने ट्विटरद्वारे सांगितले की, एक महिला क्रिकेटर लैंगिक छळाच्या प्रकरणात मदत मागण्यासाठी त्याच्याकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन दिल्ली पोलिसांनी दक्षिण-पूर्व दिल्लीतील निजामुद्दीन भागात महिलेच्या प्रशिक्षकाविरुद्ध एफआयआर नोंदवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.