मुंबई, 7 मार्च : इंग्लंडला हरवत टीम इंडिया (India vs England) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला (ICC World Test Championship Final) पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात ही मॅच नियोजित आहे, पण आता या ठिकाणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंची सुरक्षा बघता आयसीसी (ICC) फायनलचं ठिकाण बदलू शकतं.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लॉर्ड्सवरच्या फायनलबाबत विचार केला जात असल्याचं आयसीसीच्या सूत्रांनी सांगितलं. 'ठिकाणाची लवकरच घोषणा केली जाईल. आयसीसीचं प्लानिंग लॉर्ड्स नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून आयसीसी सल्ला घेईल. इंग्लंडने मागच्या वर्षी जसा बायो-बबल बनवला होता, तसा यावेळीही बनवला जाऊ शकतो,' असं आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटात वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध साऊथम्पटन आणि मॅन्चेस्टरमध्ये सीरिज खेळवली होती. या स्टेडियमच्या आतमध्येच फाईव्ह स्टार हॉटेलची व्यवस्था आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठीही हॉटेल बाहेर जायची गरज नाही. खेळाडू हॉटेलमधून सरळ मैदानात येऊ शकतात. पण इंग्लंडने भारताविरुद्ध ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेगवेगळ्या ठिकाणांची घोषणा केली आहे.
आयपीएल मे महिन्यात संपणार
आयपीएलमध्ये (IPL) टीम इंडियाचे सगळे मोठे खेळाडू उतरतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी खेळाडूंना योग्य वेळ मिळावा, यासाठी यंदा आयपीएल 30 मे रोजी संपेल, असं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Icc, IND Vs ENG, New zealand, Sports, Team india