• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WI vs AUS : T20 चा ब्रॅडमन! क्रिस गेलची विक्रमाला गवसणी

WI vs AUS : T20 चा ब्रॅडमन! क्रिस गेलची विक्रमाला गवसणी

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेल (Chris Gayle) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मध्ये इतिहास घडवला आहे. गेलने ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सची धुलाई केली, त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फोर आणि सिक्स लगावले.

 • Share this:
  मुंबई, 13 जुलै : वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेल (Chris Gayle) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मध्ये इतिहास घडवला आहे. गेलने ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सची धुलाई केली, त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फोर आणि सिक्स लगावले. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असणाऱ्या क्रिस गेलने 9 व्या ओव्हरमध्ये एडम झम्पाच्या (Adam Zampa) पहिल्या बॉलला सिक्स मारली, याचसोबत त्याने टी-20 मध्ये 14 हजार रन पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो जगातला पहिलाच खेळाडू आहे. क्रिस गेलने दुसऱ्या ओव्हरमध्ये जॉश हेजलवूडचीही (Josh Hazlewood) धुलाई केली. या ओव्हरच्या अखेरच्या 4 बॉलवर त्याने 18 रन जोडले. यात 6,4,4,4 चा समावेश होता. यानंतर त्याने एडम झम्पाच्या एका ओव्हरमध्ये लागोपाठ 3 सिक्स मारून 33 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं गेलचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. याआधी मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला अर्धशतक करता आलं होतं. गेलने आपल्या या आतिषी खेळीमध्ये 38 बॉल खेळून 67 रन केले. यातल्या 58 रन तर त्याने फोर आणि सिक्सच्या मदतीने केल्या. गेलच्या या इनिंगमध्ये 4 फोर आणि 7 सिक्स होत्या. 430 टी-20 मॅचमध्ये गेलच्या नावावर 14 हजार 38 रन आहेत. यात त्याने 22 शतकं आणि 87 अर्धशतकं केली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये गेलचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 175 रन आहे. 2013 सालच्या आयपीएलमध्ये पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गेलने ही विक्रमी खेळी केली होती. यानंतर 2015 साली केंटविरुद्ध गेलने नाबाद 151 रन केले. 2017 साली ढाका डायनामाईटविरुद्ध त्याने नाबाद 146 रन, 2012 साली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद 128 रन आणि 2017 साली खुलना टायटन्सविरुद्ध नाबाद 126 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय झाला, याचसोबत त्यांनी 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
  Published by:Shreyas
  First published: