मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: भारत, पाकिस्तानला हरवणारी श्रीलंका नामिबियासमोर का हरली? 'ही' आहेत महत्वाची कारणं

T20 World Cup: भारत, पाकिस्तानला हरवणारी श्रीलंका नामिबियासमोर का हरली? 'ही' आहेत महत्वाची कारणं

श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

T20 World Cup: टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकन बॉलर्सनी चांगली सुरुवातही केली पण तरीही श्रीलंकेच्या हातून ही मॅच का निसटली? असा प्रश्न उपस्थित होतो.

गिलॉन्ग, 16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियात आज आठव्या टी20 वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं. पण वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. महिनाभरापूर्वी आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तानसारख्या टी20तल्या बलाढ्य संघांना हरवणाऱ्या आणि माजी टी20 वर्ल्ड कप विजेत्या श्रीलंकेवर आज मात्र नामिबियासारख्या संघाकडून पराभव स्वीकारण्याची वेळ आली. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकन बॉलर्सनी चांगली सुरुवातही केली पण तरीही श्रीलंकेच्या हातून ही मॅच का निसटली? असा प्रश्न उपस्थित होतो. पण याची काही कारणंही आहेत.

श्रीलंका का हरली?

कारण 1 - अखेरच्या ओव्हर्समध्ये अनियंत्रित गोलंदाजी

श्रीलंकेच्या बॉलर्सनी 15 व्या ओव्हरपर्यंत नामिबियाला चांगलच रोखून धरलं होतं. तेव्हा नामिबियाची अवस्था 6 बाद 95 अशी होती. पण त्यानंतर शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये श्रीलंकन गोलंदाजी भरकटली. फ्रायलिंक आणि स्मिटनं लंकन गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि या 5 ओव्हर्समध्ये 68 धावा वसूल केल्या. त्यामुळे बॅटिंग करताना श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

कारण 2 - सलामीच्या जोडीचं अपयश

पथुन निसंका आणि कुशाल मेंडिस ही जोडी श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा आहे. पण पहिल्या 4 ओव्हरमध्येच हे दोघेही माघारी परतले आणि श्रीलंका बॅकफूटवर गेली. आशिया कपमध्ये या दोघांच्या जोरावर श्रीलंकेनं बलाढ्य संघांविरुद्ध विजय खेचून आणला होता.

हेही वाचा - T20 World Cup: लंकेची झाली दैना... 'या' टीमनं वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केला मोठा उलटफेर

कारण 3 - बेजबाबदार फटकेबाजी

नामिबियाचं आव्हान मोठं होतं. त्यामुळे श्रीलंकेकडून मधल्या फळीत छोट्या छोट्या भागिदाऱ्या होणं अपेक्षित होतं. पण अशा वेळी श्रीलंकन फलंदाज बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. याचा मोठा फटका संघाला बसला.

कारण 4 - नामिबियाला हलक्यात घेणं नडलं?

नामिबियानं याआधी कधीही एखाद्या मोठ्या संघाविरुद्ध विजय मिळवलेला नव्हता. त्यामुळे नामिबियाला श्रीलंकेनं साधी टीम समजण्याची चूक केली. आणि पहिल्या 15 ओव्हर्समध्ये सामना हातात असतानाही श्रीलंकेनं सामन्यावरची पकड घालवली.

श्रीलंकेसाठी पुढचे दोन्ही सामने महत्वाचे

क्वालिफाईंग फेरीत खेळणाऱ्या श्रीलंकेला आता पुढचे दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं आहे. कारण गटातल्या 4 पैकी 2 टीम्स सुपर 12 साठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेला यूएई आणि नेदरलँड या दोन संघांविरुदध चांगली कामगिरी करावी लागेल.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket, T20 world cup 2022