मुंबई, 30 मार्च : कोरोना महामारीचा मोठा फटका क्रिकेटला बसला आहे. मागील वर्षातील बहुतेक काळ क्रिकेट बंद होते. सध्या देखील अनेक निर्बंधांमध्ये मोजक्याच क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची (Cricket West Indies) कोरोनामुळे अवस्था बिकट झाली होती. कोरोनामुळे हे बोर्ड आर्थिक संकटात सापडले होते. खेळाडूंना पगार देण्यासाठी बोर्डावर चक्क उधारीची वेळ आली होती, असा गौप्यस्फोट वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरीट (Ricky Skerritt) यांनी केला आहे.
स्केरीट हे गेल्या दोन वर्षांपासून वेस्ट इंडिज बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत आता संपली असून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
स्केरीट यांनी 'ईएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना वेस्ट इंडिज बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. 'आमच्यावर जवळपास दोन कोटी डॉलरचं कर्ज होतं. ते चुकवण्यासाठी आम्हाला सतत उधारी घ्यावी लागत होती. आमच्याकडे कोणताही फंड नव्हता. कोरोना महामारीमुळे पैशांची व्यवस्था करणं कठीण झालं होतं. वेस्ट इंडिज बोर्डातील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नव्हते.
महामारीच्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारावर काम केलं, अशी माहिती स्केरीट यांनी दिली आहे. स्केरीट यांनी पुढे सांगितलं की, 'आम्ही आमचा खर्च कमी केला. अनावश्यक कामं बंद केली. याचा परिणाम आता दिसत आहे. दोन वर्षांमध्ये आमचं कर्ज एक तृतीयांश बाकी आहे. संकाटाची परिस्थिती देखील एक संधी आहे, असं समजून आम्ही जबाबदारीनं काम केलं.' असं त्यांनी स्पष्ट केलं.
( वाचा : धक्कादायक! भारतीय क्रिकेट टीमच्या या कॅप्टनला कोरोनाची लागण )
मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाले होते. त्यानंतर जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौऱ्यानं क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. सध्या श्रीलंकेची टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कोरोना महामारीनंतर वेस्ट इंडिजची ही पहिलीच होम सीरिज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.