कोलकाता, 8 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections 2021) तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. त्यातच सगळ्यांचं लक्ष बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीवरही (Sourav Ganguly) आहे. सौरव गांगुली लवकरच राजकारणात प्रवेश करेल, असं बोललं जात आहे. या प्रश्नावर सौरव गांगुलीने मौन सोडलं आहे. आज तकशी बोलताना सौरव गांगुलीने सूचक वक्तव्य केलं आहे. आयुष्याने मला खूप संधी दिल्या, बघू पुढे काय होतं, असं सौरव गांगुली म्हणाला. माझी तब्येत आता ठीक आहे आणि कामालाही सुरूवात केल्याचं गांगुलीने सांगितलं.
राजकारणात प्रवेश करण्याबाबत सौरव गांगुलीने थेट उत्तर देणं टाळलं, त्यामुळे त्याची नेमकी रणनीती काय आहे, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानात प्रचारसभा घेतली. या सभेत गांगुली सहभागी होईल, असं बोललं जात होतं, पण तो आला नाही. मागच्या काही काळापासून गांगुलीची तब्येतही खराब आहे. 2 जानेवारीला घरात व्यायाम करत असताना त्याला हृदय विकाराचा धक्का लागला. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तो घरी आला, पण 27 जानेवारीला त्याची तब्येत पुन्हा बिघडली. यानंतर त्याला कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
आता गांगुलीची तब्येत व्यवस्थित असून आयपीएल 2021 (IPL 2021) चं यशस्वी आयोजन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर 30 मे रोजी फायनल खेळवली जाणार आहे. यावर्षी कोणतीही टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही. आयपीएलचं आयजोन मुंबई, कोलकाता, चेन्नई, बँगलोर, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये होणार आहे.