• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • राहुल द्रविडची जागा घ्यायला या दिग्गज खेळाडूचा नकार, BCCI ची ऑफर धुडकावली

राहुल द्रविडची जागा घ्यायला या दिग्गज खेळाडूचा नकार, BCCI ची ऑफर धुडकावली

राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) राहुल द्रविड सध्या प्रमुख असलेल्या एनसीएमध्ये (NCA Chief) त्याचा नवा उत्तराधिकारी शोधत आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) राहुल द्रविड सध्या प्रमुख असलेल्या एनसीएमध्ये त्याचा नवा उत्तराधिकारी शोधत आहे. यासाठी बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) विचारणा केली, पण त्याने बीसीसीआयची ही ऑफर नाकारल्याचं वृत्त आहे. द्रविड जर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला तर त्याला एनसीए प्रमुख (NCA Chief) हे पद सोडावं लागेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय भाषाशी बोलताना द्रविडने टीम इंडियाचा कोच व्हायला होकार दिला असल्याचं सांगितलं आहे. 'हो, राहुल 2023 वनडे वर्ल्ड कपपर्यंत टीमला कोचिंग देण्यासाठी तयार झाला आहे. सुरुवातीला तो या जबाबदारीसाठी इच्छुक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाह यांनी त्याचं मन वळवलं. ही जबाबदारी अंतरिम असणार नाही,' असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मणने एनसीए प्रमुख व्हायला नकार दिला आहे. लक्ष्मण सध्या आयपीएलमध्ये हैदराबाद टीमचा आणि रणजी ट्रॉफीमध्ये बंगालचा मेंटर आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक, बॅटिंग प्रशिक्षक, बॉलिंग प्रशिक्षक, फिल्डिंग प्रशिक्षक, एनसीएसाठी मुख्य प्रशिक्षक या पदांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 26 ऑक्टोबर आहे, तर इतर पदांसाठी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड रवी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकाची जागा घ्यायची शक्यता आहे, तर बॉलिंग कोच म्हणून द्रविडचा विश्वासू असलेला पारस म्हाम्ब्रे काम पाहू शकतो. तर सध्या बॅटिंग कोच असलेले विक्रम राठोड या पदावर कायम राहू शकतात. सध्या भरत अरुण टीमचे बॉलिंग कोच आणि आर श्रीधर फिल्डिंग कोच आहेत.
  Published by:Shreyas
  First published: