मुंबई, 15 डिसेंबर : बीसीसीआय आणि टेस्ट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli vs BCCI) यांच्यातले मतभेद बुधवारी अखेर सार्वजनिक झाले. विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेला दावा फेटाळून लावला. टी-20 ची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं आपल्याला सांगण्यात आलं नव्हतं, असं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला. एवढच नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट टीमची घोषणा करण्याच्या दीड तास आधी आपल्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी सांगितल्याचं विराटने सांगितलं.
विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे गांगुली दु:खी असल्याचं बोललं जातंय, पण बोर्डाचा अध्यक्ष म्हणून तो सामूहिक निर्णय घेण्याच्या विचाराचा असेल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. 'बीसीसीआयसाठी हे खूपच अडचणीच आहे. बोर्डाने जर प्रसिद्धी पत्रक काढलं तर कॅप्टन खोटा ठरले आणि प्रसिद्धी पत्रक काढलं नाही तर अध्यक्षावर प्रश्न उपस्थित होतील. कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचं खूप नुकसान झालं आहे,' असं अधिकारी म्हणाला. टी-20 कॅप्टन्सी सोडणं योग्य आहे का? असा विचारण्यात आलं तेव्हा यात 9 लोकांचा समावेश होता. पाच निवड समितीचे सदस्य, अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे यात होते.
विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये संवादाचा अभाव आहे, हे दिसून आलं आहे. याशिवाय रोहितला वनडे टीमचा कॅप्टन केल्याची घोषणा करताना बीसीसीआयने केलेल्या ट्वीटमध्ये विराट कोहलीचा उल्लेखही नव्हता. तसंच विराट कोहलीनेही यानंतर रोहित शर्माला शुभेच्छाही दिल्या नाहीत, या सगळ्यामुळे संशय आणखी वाढला.
गांगुलीचं वक्तव्य विराटने फेटाळलं
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.