अहमदाबाद, 19 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने डिप्रेशनबाबत खुलासा केला आहे. 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात बॅटिंगमध्ये वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे मी तणावात होतो. डिप्रेशनमुळे आपण जगात एकटे पडलो आहोत, असं वाटत होतं, असं विराट कोहली म्हणाला आहे. इंग्लडचे माजी क्रिकेटपटू मार्क निकोलस यांच्या नॉट जस्ट क्रिकेट या पॉडकास्टमध्ये विराटने हा खुलासा केला. या कठीण दौऱ्यादरम्यान मी एका कठीण टप्प्यातून गेलो, असेही विराटने यावेळी सांगितले. त्यावेळी तू नैराश्याने (Depression) ग्रस्त होतास का, असा प्रश्न विचारला असता, त्याने हो, होतो. असं उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘आपण रन करू शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर मनाची चांगली स्थिती राहणं कठीण असतं पण, मला असं वाटतं की प्रत्येक बॅट्समन त्याच्या कारकीर्दीत अशा मानसिक स्थितीतून जातच असावा. त्या काळात कुठल्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वागण्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही.’
2014 मध्ये कोहलीने इंग्लड दौरा (England Tour) केला होता. परंतु हा दौरा त्याच्यासाठी फारसा यशस्वी ठरला नाही. कारण त्याने 5 टेस्टमध्ये अनुक्रमे 1, 8, 25,0,39,28,0,7,6 आणि 20 असे रन्स केले होते. 10 इनिंग्जमध्ये त्याची सरासरी 13.40 राहिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो फॉर्ममध्ये परतला आणि त्याने कसोटी मालिकेत 692 रन केले होते.
इंग्लड दौऱ्याबाबत विराट म्हणाला, ‘त्या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचं, हे तुम्हाला समजतच नाही. त्या फेजमध्ये परिस्थिती बदलण्यासाठी अगदी शब्दश: मी काहीही करू शकत नव्हतो. मला खरोखरच त्यावेळी असं वाटलं की मी जगात एकटा पडलो आहे.’
माझ्या आयुष्यात अनेक लोक माझ्यामागे भक्कमपणे उभे असतानाही, मला एकटेपणा जाणवला होता. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी मला प्रोफेशनल हेल्प आवश्यक होती आणि ती उपलब्ध नव्हती, असं विराटने सांगितलं. आपण एका मोठ्या टीमसोबत असूनही आपल्याला एकटं वाटू शकतं, ही भावना हा जणू माझ्यासाठी एक साक्षात्कारच होता. मी असे म्हणू शकत नाही, की माझ्याजवळ असे लोक आहेत ज्यांच्याशी मी बोलू शकलो असतो. पण मला समजवून घेऊन मदत करेल अशी प्रोफेशनल व्यक्ती, तेव्हा जवळ नव्हती. माझ्या मनात काय चाललंय आणि मी कोणत्या गोष्टींना सामोरं जातोय, हे समजून घेणारं कुणी नव्हतं. आणि ती फारच महत्त्वाची गोष्ट होती, असंही कोहलीने यावेळी स्पष्ट केलं.
मानसिक अडचणींकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये कारण त्यामुळे त्या व्यक्तीचं करिअर संपू शकतं, असं आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट बॅट्समनपैकी एक असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीला वाटतं. या मुलाखतीत कोहली म्हणाला, ‘ज्या कोणाकडे जाऊन तुम्ही संवाद साधू शकता, त्याच्याशी बोला. झोपही लागत नाहीए. सकाळी उठूच नये, असं वाटतं. माझा आत्मविश्वासच हरवला आहे. आता मी काय करू?, असे प्रश्न त्या व्यक्तीसोबत शेअर करा, असे विराटने सांगितले.
बऱ्याच लोकांना दीर्घकाळ असा त्रास सहन करावा लागतो. अनेक महिने जाऊन सुध्दा ते यातून बाहेर येत नाहीत. संपूर्ण क्रिकेट हंगाम जातो, तरी ते या स्थितीतून बाहेर येऊ शकत नाही. अशावेळी प्रोफेशनल मदतीची गरज असते, असं विराट म्हणाला.
कोहली सध्या इंग्लडविरुध्द सुरु असलेल्या टेस्ट सिरिजसाठी (England Test Series) अहमदाबादमध्ये आहे. दोन्ही टीमनी प्रत्येकी १ सामना जिंकून बरोबरी साधली आहे. 24 फेब्रुवारीपासून तिसरी टेस्ट मॅच सुरु होत आहे.
बालपणाविषयी बोलताना विराट म्हणाला, की 90 च्या दशकातील भारतीय टीमने खरोखरच या खेळासाठी मला प्रेरित केलं. 90 च्या दशकातील भारतीय टीमने या खेळामध्ये किती उंची गाठता येऊ शकते, हे मला दाखवून दिलं कारण मी असा खेळ याआधी कधीच पाहिला नव्हता. एखाद्याचा स्वत:वर विश्वास असेल आणि त्याने दृढनिश्चय केला तर त्याच्या आयुष्यात जादुई घटना घडू शकतात, हे या टीमने माझ्या मनावर बिंबवलं. तिथूनच देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न साकार करण्याची ठिणगी माझ्या हृदयात चेतली.
विराटच्या वयाच्या 18 वर्षी त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने सपोर्टर असणारे त्याचे वडील प्रेमचंद यांचे निधन झाले. याबाबत तो म्हणाला, ‘सुरुवातीच्या काळात मी क्रिकेट खेळत रहावं किंवा माझ्या सरावात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट घेतले. पण त्यांच्या मृत्यूनंतर माझा दृष्टिकोन एकदम स्पष्ट झाला. त्यामुळेच माझा आत्मविश्वास अधिक बळकट झाला की काहीही झालं तरीही मी उच्च दर्जाचं आणि देशासाठी क्रिकेट खेळण्याचं माझं स्वप्न पूर्ण करू शकतो.’ कोहली हा मैदानावर जसा एक कठोर, स्पर्धात्मक आणि रहस्यमय व्यक्तीमत्व आहे, वैयक्तिक जीवनातही मी तसाच असल्याचे त्याने सांगितले.
अगदी शब्दश:च सांगायचं तर माझ्याबद्दल लोकांचा एक दृष्टिकोन तयार करण्यासाठी मी कधीच काही प्रयत्न केले नाही, पण व्यथा हीच आहे की लोक अनेक वर्षांपासून हे समजूनच घेत नाहीत. माझ्या दृष्टीने मी व्यक्ती म्हणून काय करू शकतो आणि क्रिकेट मैदानावर एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो. मी विशिष्ट गटातील लोकांचं माझ्याबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून कधीच नाटकी वागत नाही. मी खरा तसा नाही. अपेक्षांबद्दल तुम्ही जेव्हा अतिविचार करायला लागता तेव्हा त्यांचं ओझं होतं, त्यामुळे माझ्याकडून कोण काय अपेक्षा करतं, याचा मी फारसा विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.