मुंबई, 15 जानेवारी : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्याच्या 24 तासांमध्येच विराटने टेस्ट कॅप्टन्सीही सोडली आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपण टेस्ट टीमचं नेतृत्व सोडत असल्याचं सांगितलं आहे.
गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा वाद सुरू आहे. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराट कोहलीला आम्ही टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगितलं होतं, पण तो ऐकला नाही. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटची वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी करण्यात आली, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
सौरव गांगुलीने केलेला हा दावा विराट कोहलीने फेटाळून लावला. मला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं नव्हतं, तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची टेस्ट टीम निवडण्याच्या दीड तास आधी मला तू आता वनडे टीमचा कर्णधारही असणार नाहीस, असं निवड समितीने सांगितल्याचा दावा विराट कोहलीने केला होता.
विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडच्या जमिनीवर टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली. एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virat kohli