नवी दिल्ली, 20 जानेवारी : गावसकर-बॉर्डर ट्रॉफीसाठीच्या (Gavaskar-Border Trophy) कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्लेल्या भारतीय संघाने 19 जानेवारीला यजमान ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनच्या (Brisbane) गॅबा स्टेडियमवर धूळ चारून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. आधीच्या नामुष्कीजनक पराजयाचा ताण, कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती आणि दुखापतग्रस्त संघ या पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेच्या शांत, संयत आणि प्रगल्भ नेतृत्वामुळे हा विजय साध्य झाला. त्यामुळे 19 जानेवारी 2021पूर्वीची टीम इंडिया आणि त्यानंतरची टीम इंडिया यात मोठा फरक आहे. या सगळ्यामुळे विराट कोहलीच्या कर्णधारपदावर कोणतंही प्रश्नचिन्ह वगैरे उपस्थित झालेलं नाही किंवा बीसीसीआय दुरान्वयेही या गोष्टीवर विचार करत नाही; पण दृष्टिकोनाचा विचार करायचा झाला, तर कर्णधारपद विभागलं गेल्याची चर्चा मात्र ऐकू येऊ लागली आहे. त्याबद्दलचे काही आवाज तर मोठ्याने ऐकू येऊ लागले आहेत. याहू न्यूजने पीटीआयच्या हवाल्याने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
वेळोवेळी डावलल्या गेलेल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) संयत नेतृत्वाखाली आणि काही सीनियर खेळाडूंच्या नेतृत्वगटामुळे भारतीय संघाने परदेशात मोठा विजय प्राप्त केला, त्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. तरीही रहाणेकडे संघाचं नेतृत्व कायमसाठी दिलं जाण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात तरी फारशी दिसत नाही.
हे खरं असलं तरी महिन्याभराच्या पितृत्व रजेनंतर कोहली (Virat Kohli) जेव्हा परत ड्रेसिंग रूममध्ये परतेल, तेव्हा भारतीय टीमच्या लीडरशीप ग्रुपच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो.
कोहली रजेवर गेला, तेव्हा भारतीय टीम 36 या आतापर्यंतच्या सर्वांत कमी धावसंख्येवर ऑल आउट झाली होती आणि अक्षरशः लाजिरवाणा पराभव संघाच्या पदरी पडला होता; पण अॅडलेडमधल्या त्या पराभवानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात, की हा संघ कोहलीचा ठसा आणि व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतो. ते खरंच आहे; पण 19 डिसेंबरला अॅडलेडपासून 19 जानेवारीला ब्रिस्बेनपर्यंत झालेल्या प्रवासानंतर संघातील काही सीनियर क्रिकेटपटूंबद्दल वेगळ्या पद्धतीनी विचार केला जाईल.
रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अर्थातच अजिंक्य रहाणे यांनी निश्चितच त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने एक छोटासा का होईना, पण ठसा उमटवला आहे; पण ब्रिस्बेन कसोटीनंतर मात्र त्या ठशाची योग्य पद्धतीने दखल घ्यावी लागणार आहे. हे चौघेही त्यासाठी मागे लागणार नाहीत. कारण त्यांनी ते स्वतः कष्टाने तयार केलं आहे.... पण जेव्हा कोहली परतेल, तेव्हा तो निश्चितच पहिल्या स्थानावर असला, तरी संघाच्या नेतृत्वगटात एका समान स्थानावर असेल. हा नेतृत्वगट अधिक सर्वसमावेशक असेल.
ब्रिस्बेनचा सामना संपल्यानंतर पीटीआयने रहाणेला प्रश्न विचारला, की 'कोहली परतल्यावर पुन्हा स्टेअरिंग व्हील सोडून मागच्या सीटवर येऊन बसायला कसं वाटेल?' त्यावर रहाणेनं उत्तर दिलं, की 'मला या गोष्टींबद्दल विचार करावासा वाटत नाही. हा विजय आहे आणि आम्हाला त्या विजयाचा आनंद घ्यायचा आहे. भारतात परतल्यावर मी इंग्लंड मालिकेचा विचार करीन.'
अशा प्रकारे रहाणेनं प्रश्नाला बगल दिली असली, तरी तो मनातून हे नक्कीच विसरलेला नसणार, की तो उपकर्णधार असतानाही 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या मालिकेत प्लेइंग 11 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नव्हता.
काही जण यावर काही स्पष्टीकरण देऊ शकतात; मात्र उपकर्णधाराला संघातून बाजूला ठेवणं या वस्तुस्थितीकडे स्वतंत्रपणे पाहता येणार नाही. आताच्या मालिकेत ऋषभ पंत (Rishabh Pant) (274) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) (271) यांच्यानंतर रहाणेने 268 धावा करून तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट इतिहासात त्याने आपलं स्वतःचं स्थान तयार केलं आहे. त्यामुळे तो फारसा व्यक्त होत नसला, तरी त्याचा आवाज, त्याचं म्हणणं ऐकलं जावं असं त्याला वाटत असेल, तर ते आता नक्की ऐकलं जाईल.
'त्याच्या शतकामुळे संघ पुन्हा ट्रॅकवर आला,' अशा शब्दांत शास्त्री यांनी त्याच्या प्रभावाची दखल घेतली.
रविचंद्रन आश्विनचं (R. Ashwin) उदाहरण घेऊ. त्याने तीन सामन्यांत 12 बळी घेतले. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) 13 बळी घेतले. त्यानंतर अश्विनचा क्रमांक आहे. त्याला स्वतःलाही याची जाणीव आहे, की ही त्याची परदेशातील सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच, त्याने स्टीव्ह स्मिथचा घेतलेला बळी दीर्घ काळ स्मरणात राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, India vs Australia, Team india, Virat kohali