VIDEO : 'क्रिकेटमध्ये असं कधीच पाहिलं नाही', जडेजाच्या धावबादवरून विराट भडकला

VIDEO : 'क्रिकेटमध्ये असं कधीच पाहिलं नाही', जडेजाच्या धावबादवरून विराट भडकला

जडेजाला वादग्रस्त पद्धतीने धावबाद दिल्याचा आरोप करत भारताचा कर्णधार विराट कोहली सामन्यानंतर भडकला. त्याने क्रिकेटचे नियम कुठे आहेत असा सवालही केला.

  • Share this:

चेन्नई, 16 डिसेंबर : विंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. हेटमायर आणि शाय होप यांच्या शतकाच्या जोरावर विंडिजने विजय मिळवला. या सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने जडेजाच्या धावबाद होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विराट म्हणाला की, आतापर्यंत मी असं कधीच पाहिलं नाही. जडेजा 48 व्या षटकात धावबाद झाला. तेव्हा सुरुवातीला मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवलं होतं पण तिसऱ्या पंचांनी बाद ठरवलं.

सामन्यातील 48 व्या षटकात जडेजा वेगाने धावत क्रीजच्या जवळ पोहचला असताना रोस्टन चेजने थेट थ्रो मारला. यावेळी विंडिजच्या खेळाडूंनी अपील केलं नाही. त्यामुळे मैदानावरील पंचांनी जडेजाला बादही दिलं नाही. त्यानंतर विंडिजचा कर्णधार पोलार्डने पंचांकडे अपील केलं. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तेव्हा जडेजा क्रीजमध्ये पोहचण्याआधी चेंडू यष्ट्यांना लागल्याचं स्पष्ट झाल्यावर तो बाद असल्याचा निर्णय दिला गेला.

जडेजा धावबाद असल्याबद्दल संभ्रमात असलेल्या विंडिजच्या खेळाड़ूंना मैदानाबाहेरून तो बाद असल्याचा इशारा सहकाऱ्यांनी केला. त्यानंतर पोलार्डने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि जडेजा धावबाद असल्याचा निर्णय झाला.

जडेजाला बाद ठरवण्याच्या निर्णयावर भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र नाराज दिसला. त्याने याबाबत चौथ्या पंचांशी चर्चा केली. विराट म्हणाला की, क्षेत्ररक्षकाने अपील केलं नव्हतं. पंचांनी नाबाद ठरवलं होतं. तेव्हा मैदानाबाहेरचे लोक रिव्ह्यूबद्दल सांगू शकत नाहीत. असं मी क्रिकेटच्या मैदानात कधीच पाहिलं नाही. मला माहिती नाही कुठे आहेत क्रिकेटचे नियम. मॅच रेफ्री आणि पंचांनी निर्णय घ्यायला हवा. मैदानाबाहेरून लोक सांगू शकत नाहीत की तिथं काय घडलं.

पोलार्डने याबाबत सांगितलं की, काहीही झालं तरी निर्णय योग्य झाला. शेवटी योग्य निर्णय घेतला गेला आणि माझ्यासाठी हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या