नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: भारत आणि इंग्लंड (Ind Vs Eng) दरम्यान सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेच्या निकालावरून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) फायनल फेरीत कोणता संघ पोहचेल याचा निर्णय होणार आहे. न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाने यापूर्वीचं फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आता फायनलमधील दुसऱ्या संघाच्या शर्यतीत भारत-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे तगडे तीन संघ आहेत.
त्यामुळे फायनलमध्ये पोहचण्याची चांगली संधी भारताकडे आहे, पण तत्पूर्वी भारताला किमान 2 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. शिवाय इंग्लंडला 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत करावं लागेल. पण चेन्नई कसोटीत टीम इंडियाने अशी चूक केली आहे, जी भारतासाठी खूपच महागात पडू शकते. विजडनने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने अत्यंत धीम्या गतीने ओव्हर्स टाकल्या आहेत. ज्यामुळे भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीचे पॉंइट्स कमी केले जाऊ शकतात. कारण असा प्रकार यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासोबत घडला आहे. टिम पेनच्या संघानेही अशीच चूक केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे पाँइट्स वजा करण्यात आले होते. परिणामी न्यूझीलंडच्या संघाचे पाँइट्स वाढले होते.
हे ही वाचा-Ind vs Eng: आर अश्विनने इंग्लंडच्या 'या' खेळाडूला तब्बल 8 वेळा केलं बाद
भारतीय संघाने चेन्नईतील कसोटी सामन्यात टी ब्रेकनंतरच्या 90 मिनिटांत केवळ 19.3 षटकं टाकली होती. आयसीसीच्या नियमांनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये एका तासात 15 षटकं टाकणं बंधनकारक आहे. या तुलनेत भारताने चौथ्या दिवशी खूपच धीम्या गतीने गोलंदाजी केली आहे.
हा नियम कोहलीला माहित नव्हता का?
चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं पूर्ण लक्ष इंग्लंडला जास्तीत जास्त चेंडू खेळवण्याकडे होता. म्हणूनच भारताचा ओव्हर रेट खूपच धीमा होता. पण विराट कोहलीची ही रणनीती पुढे जावून भारतासाठी नुकसानकारक ठरू शकते.
हे ही वाचा-उत्तराखंडमधील घटनेनंतर ऋषभ पंतने असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक
फायनलमध्ये पोहचण्यासाठीची समीकरणं
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2 सामने जिंकावे लागतील. टीम इंडिया 1-0 फरकाने जरी जिंकली तरी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर भारताने जर ही मालिका 2-1 ने जिंकली, तर भारत फायनलमध्ये प्रवेश करू शकेल. दुसरीकडे इंग्लंडने ही मालिका 1-0, 2-0 किंवा 2-1 ने जिंकली तर याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल; आणि तो संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचेल. याव्यतिरिक्त इंग्लंडला फायनलमध्ये पोहचायचं असेल तर भारताला 3-0, 3-1 किंवा 4-0 अशा फरकाने हरवावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virat kohli