चेन्नई, 18 मार्च: आयपीएलच्या 12व्या हंगामाची सुरुवात होण्याकरिता केवळ पाच दिवस उरले आहेत. या हंगामात पहिलाच सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरू यांच्यात होणार आहे. एकीकडे धोनीचा संघ पहिल्या सामन्यासाठी तयार असताना, कोहली मात्र वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. ती समस्या म्हणजे, सलामी फलंदाजांच्या जोडीची.
कोहलीच्या बंगळुरू संघांने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे यंदा जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणाऱ्या या संघापुढे सलामीच्या जोडीची समस्या मोठी असणार आहे. कारण बंगळुरू संघ सलामीच्या फलंदाजांवर जास्त अवलंबून आहे. गेल्या दहा वर्षात कोहलीला एकही चांगली सलामीची जोडी मिळालेली नाही. त्यामुळे यंदा कोहलीच सलामीला उतरतो की काय, असे प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट आतापर्यंत अनेक वेळा सलामीला आला आहे. पण विराटशिवाय, पार्थिव पटेल हा बंगळुरूकरिता महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो. याशिवाय मोईन अली, मार्कस स्टोईनिस, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही सलामीला येऊ शकता.
कोहलीने आयपीएलमध्ये 4948 धावा केल्या आहेत. तरी, सांघिक खेळ कमी पडल्यामुळे बंगळुरूला आयपीएल जिंकता आले नाही. बंगळुरूकडे कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे फलंदाज असूनही गेली 10 वर्ष चोकर्स असणारा हा संघ शनिवारी यंदाच्या हंगामात आपला पहिला विजय नोंदविण्यास सज्ज असेल. आयपीएलच्या या 12व्या हंगामात बंगळुरूचा पहिला सामना बलाढ्य चेन्नईशी होणार असल्यामुळे 12व्या हंगामातील पहिला सामना अटीतटीचा होणार हे नक्की.
VIDEO: प्रियांका गांधी जेव्हा लोकांना विचारतात, तुम्ही मला कसं ओळखलंत?