दुबई, 27 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने (IND vs PAK) अगदी सहज खिशात घातला. टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट जगतात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच माजी पाकिस्तानी कर्णधार सना मीरने (Sana mir ) दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. यासोबत वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात विजयी न होण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानने मोडीत काढला. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर अनेकांनी निशाणा साधला. मात्र, माजी पाकिस्तानी कर्णधार सना मीरने विराटजे कौतुक केले आहे.
सना मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, “विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचं मी कौतुक करते. मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणं वास्तवात फार चांगलं आहे”. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचा फोटो शेअर करत खेळभावनेचं कौतुक केलं होतं. पाकिस्तानच्या विजयानंतर सना मीरने त्यांचा कर्णधार बाबरने संपूर्ण सामन्यात दाखवलेल्या वागणूकीचंही कौतुक केलं.
जर भारताने मोठ्या विजयासोबत पुनरागमन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि मला आशा आहे की स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतील, असेही तिने म्हटले आहे.
पाकिस्तानी महिला संघाची माजी कर्णधार ही महिला क्रिकेटमधली एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाते. क्रिकेटच्या मैदानावर तिच्या कामगिरीसोबत सना मीर तिच्या लुक्सबद्दलही चांगलीच चर्चेत असते.
1992 पासून 2019पर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धांत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या प्रत्येक मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. अशा एकूण 12 मॅचेस भारताने जिंकल्या होत्या. त्यामुळे या वेळीही भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण, यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये इतिहास बदलला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 cricket, T20 world cup, Virat kohli