जोहान्सबर्ग, 2 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच (India vs South Africa 2nd Test) सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) टीमचं नेतृत्व करणार आहे, पण मॅचआधी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आला. द्रविडलाही विराट पत्रकार परिषदेला का आला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली पुढच्या पत्रकार परिषदेला येणार आहे, असं मला सांगण्यात आल्याचं उत्तर द्रविडने दिलं. विराट त्याच्या 100 व्या टेस्टच्या (Virat Kohli 100th Test) पूर्व संध्येला मीडियासोबत बोलेल, असं मला सांगितलं गेलं आहे. तेव्हा तुम्ही विराटला प्रश्न विचारू शकता, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.
33 वर्षांच्या विराटने आतापर्यंत 98 टेस्ट मॅचमध्ये 27 शतकं आणि तेवढ्याच अर्धशतकांच्या मदतीने 7,854 रन केले. विराट त्याची 100 वी टेस्ट मॅच केपटाऊनमध्ये 11 जानेवारीपासून खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या पत्रकार परिषदेनंतर विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीही पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्यावेळीही राहुल द्रविडच मीडियाला सामोरा गेला होता.
काय झाला वाद?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी विराटने आधीच सोडली होती. विराटला कॅप्टन्सी न सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तो ऐकला नाही. निवड समितीला वनडे आणि टी-20 साठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. गांगुलीचा हा दावा विराट कोहलीने खोडून काढला. टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याबाबत मला सांगण्यात आलं नाही, तसंच टेस्ट टीमची निवड करण्याआधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवल्याचं सांगण्यात आलं, असं विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
कर्णधारानेच बीसीसीआय अध्यक्षाचा दावा खोटा ठरवल्यामुळे विराट आणि गांगुलीमधला वाद समोर आला. अखेर गांगुलीने समोर येऊन, माझ्यासाठी हे प्रकरण संपलं आहे. या गोष्टीमध्ये आता बीसीसीआय लक्ष घालेल, अशी प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, South africa, Team india, Virat kohli