दुबई, 26 ऑगस्ट: भारत आणि पाकिस्तान संघातला आशिया चषकातला सामना अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. क्रिकेट विश्वातले हे दोन अव्वल प्रतिस्पर्धी तब्बल दहा महिन्यांनी पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. त्यासाठी दोन्ही संघ नुकतेच दुबईत दाखल झाले आहेत. दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी सहा वर्षात पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसेल. कारण 2016 नंतर त्यानं पुढच्या आशिया चषकात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे विराट पुन्हा एकदा आशिया चषक गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि यावेळी विराटच्या भात्यात आपल्याला एक नवं शस्त्र दिसणार आहे.
विराटनं आशिया चषकासाठी आपल्या किटमध्ये एका नव्या बॅटचा समावेश केला आहे. आतापर्यंत विराटला आपण एमआरएफ जिनियस असा लोगो असलेली बॅट घेऊन खेळताना पाहत होतो. पण आशिया चषकात विराट एमआरएफ विझार्ड गोल्ड ही बॅटसुद्धा वापरताना दिसेल.
विराटच्या बॅटची किंमत काय?
विराट कोहली सर्वोत्तम इंग्लिश विलोच्या बॅट वापरतो. तो आधीपासून वापरत असलेल्या एमआरएफ जिनियस कॉन्कर या बॅटची किंमत तब्बल 40 हजार इतकी आहे. तर नव्या एमआरएफ विझार्ड गोल्ड बॅटची किंमत 27 हजारच्या घरात आहे. आशिया चषकात विराटच्या या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते करत आहेत.
हेही वाचा - नोव्हाक जोकोविच पुन्हा वादात, COVID लस न घेतल्याने या स्पर्धेतूनही बाहेर
आशिया चषकात ‘विराट’ मॅजिक?
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा फॉर्मात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. आगामी आशिया चषकात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आशिया चषक विराटसाठी लकी आहे.
- आशिया चषकात विराटनं आतापर्यंत 16 सामन्यात 766 धावा ठोकल्या आहेत.
- सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो सचिन आणि रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- विराटनं आशिया चषकात तीन शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
- 2012 साली पाकिस्तानविरुद्ध केलेली 183 धावांची खेळी ही आशिया चषकातली आणि विराटची वन डेतली सर्वोत्तम खेळी.
- आशिया चषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा मान विराटकडेच आहे. त्यानं आतापर्यंत पाच वेळा सामनावीराचा बहुमान मिळवलाय.
- 2018 सालच्या आशिया चषकातून विराटनं माघार घेतली होती. पण यंदाच्या आशिया चषकासाठीच्या संघात विराटचा समावेश आहे.
- आगामी टी20 विश्वचषकाआधी विराटसाठी फॉर्मात येण्यासाठी ही एक मोठी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Pakistan, Sports