आता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको!

आता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको!

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार मात्र 2020पर्यंत घेणार नाही निवृत्ती, सुत्रांची माहिती.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेतनंतर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरोधात झालेली सेमीफायनल धोनीचा शेवटचा सामना असेल, अशा बातम्यानंतर आता मात्र धोनी एवढ्यात निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला आणखी काही काळ देशासाठी खेळण्याची विनंती केली आहे. दरम्यान दुखापतीमुळं धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. त्याआधी त्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

दरम्यान, निवड समितीनं धोनीच्या जागा कोण घेणार यासाठी तयारी सुरु केली आहे. धोनी 38 वर्षांचा असल्यामुळे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तो भारताकडून खेळण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळं भारताला पुढच्या वर्ल्ड कपसाठी विकेटकिपर आणि फिनिशर अशा दोन्ही भुमिका बजावणारा खेळाडूची गरज आहे. यात आयपीएल गाजवणाऱ्या ऋषभ पंत, इशान किशन किंवा संजु सॅमसन यांची वर्णी लागू शकते. या तिघांमध्ये ऋषभ पंत आघाडीवर आहे.

विराट आणि शास्त्रींनी केली धोनीला विनंती?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी जोपर्यंत ऋषभ पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनीला खेळण्याची विनंती केली आहे. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल. तसेच धोनी पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर धोनी टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या

First published: July 17, 2019, 1:00 PM IST

ताज्या बातम्या