जयपूर, 1 मार्च : हिमाचल प्रदेशचा तब्बल 200 रननी पराभव करत मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने (Mumbai vs Himachal Pradesh) ठेवलेल्या 322 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशचा फक्त 121 रनवर ऑल आऊट झाला, त्यांना फक्त 24.1 ओव्हरच बॅटिंग करता आली. मुंबईकडून प्रशांत सोळंकीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर शम्स मुलानीला 3, धवल कुलकर्णीला 2 आणि मोहित अवस्थीला 1 विकेट घेण्यात यश आलं. हिमाचलकडून मयंक डागरने सर्वाधिक 38 रन केले.
त्याआधी मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबईची सुरूवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वाल, पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर प्रत्येकी 2-2 रन करून आऊट झाले. मुंबईची अवस्था 49-4 अशी झालेली असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि आदित्य तरे (Aaditya Tare) यांनी डाव सावरला. सूर्यकुमारने 91 रन तर आदित्य तरेने 83 रनची खेळी केली. यानंतर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) धमाका केला. 57 बॉलमध्ये नाबाद 92 रन करून ठाकूर माघारी परतला. त्याच्या या खेळीमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.
मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमातल्या ग्रुप स्टेजच्या सगळ्या चार मॅच जिंकल्या आहेत. मुंबईने दिल्लीविरुद्ध 7 विकेटने, महाराष्ट्राविरुद्ध 6 विकेटने, पुदुच्चेरीविरुद्ध 233 रननी, राजस्थानविरुद्ध 67 रननी विजय मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.