मुंबई, 12 डिसेंबर : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खराब फिटनेसमुळे सध्या टीम इंडियामधून बाहेर आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup 2021) खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यामुळे आधी न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही (India vs South Africa) हार्दिकला टीम इंडियात जागा मिळाली नाही. हार्दिक सध्या एनसीएमध्ये (NCA) उपचार घेत आहे. एकीकडे हार्दिक पांड्या अडचणीत असतानाच त्याचा भाऊ कृणाल पांड्यादेखील (Krunal Pandya) संघर्ष करत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) पांड्या बंधूंना रिटेन केलं नाही, त्यामुळे दोघांना लिलावात उतरावं लागू शकतं.
कृणाल पांड्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) अपयशी ठरला आहे. बडोद्याकडून खेळताना कृणालने 4 सामन्यांमध्ये एकही अर्धशतक केलेलं नाही. रविवारी कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात तो 24 रन करून आऊट झाला. या सामन्यात बडोद्याचा पराभव झाला. बॉलिंगमध्ये कृणालने 10 ओव्हर टाकून 27 रन देत 1 विकेट मिळवली.
कृणाल पांड्याने पहिल्या सामन्यात बंगालविरुद्ध सर्वाधिक 39 रन केले होते आणि 2 विकेटही पटकावल्या. मुंबईविरुद्ध त्याने 7 रन केल्या आणि 1 विकेट घेतली. पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात पांड्याला बॅटने कमाल करता आली नाही. 10 रन करून तो आऊट झाला आणि त्याला 1 विकेट मिळाली, म्हणजेच 4 मॅचमध्ये कृणालला 5 विकेट मिळाल्या, पण बॅटिंगमध्ये तो अपयशी ठरला.
याआधी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही (Syed Mushtaq Ali Trophy) कृणालला चांगली कामगिरी करता आली नाही. 5 सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या सहाय्याने कृणालने 83 रन केले, त्याची सरासरी 21 ची होती. नाबाद 57 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. आयपीएल 2022 (IPL 2022) क साठी मेगा ऑक्शन होणार आहे. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार पांड्या बंधू त्यांची स्थानिक टीम अहमदाबादकडून खेळू शकतात. आयपीएलच्या पुढच्या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन टीम जोडल्या गेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, Ipl 2022 auction, Krunal Pandya, Mumbai Indians