मुंबई, 23 फेब्रुवारी : भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्येही कोरोनाचा (Corona Virus) शिरकाव झाला आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये भाग घेतलेल्या बिहारच्या एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर टीमच्या इतर सगळ्या खेळाडूंची चाचणी करण्यात आल्याचं बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच कोरोना झालेल्या खेळाडूला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हा खेळाडू सध्या बँगलोरमध्ये आहे आणि प्रवास करू शकत नाही. बिहार टीमच्या 22 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या चाचणीचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारची टीम एलीट ग्रुप सीमध्ये आहे. त्यांच्या सगळ्या मॅच बँगलोरमध्ये होणार आहेत. बुधवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारचा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. ही मॅच वेळापत्रकानुसार होईल, असा विश्वास बिहार क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
याआधी महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशच्या एक-एक खेळाडूचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. पण दोन्ही टीमनी कोरोना टेस्ट केल्यानंतर मॅच खेळल्या. महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश एलीट ग्रुप डीमध्ये आहे. जयपूरमध्ये त्यांच्या मॅच सुरू आहेत. विजय हजारे ट्रॉफीच्या सगळ्या मॅच बायो-बबलमध्ये खेळवण्यात येत आहेत.