नागपूर, 5 फेब्रुवारी : गतविजेता आणि सौराष्ट्र यांच्याच यंदाचा रणजी चषकातील अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी सौराष्ट्रच्या संघाला विदर्भाने 307 धावांत गुंडाळले. त्यांना फक्त 5 धावांची आघाडी मिळाली. नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी विदर्भाने पहिल्या डावात फलंदाजी करत 312 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राने 5 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली होती.
सौराष्ट्रचा पहिला डाव 307 धावांत आटोपला. स्नेल पटेलच्या शतकानंतरही सौराष्ट्रला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्नेल पटेलनंतर कर्णधार जयदेव उनाडकट वगळता इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. विदर्भाच्या आदित्य सरवटेने 5 विकेट घेतल्या तर अक्षय वाखरेने 4 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.
पहिल्या डावात विदर्भाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सलामीवीर संजय रामास्वामी संघाच्या 21 धावा झाल्या असताना बाद धाला. त्यानंतर कर्णधार फैज फजल, वसिम जाफरही लवकर बाद झाले. विदर्भाकडून सर्वाधिक 73 धावा अक्षय कर्नेवारने केल्या. त्यानंतर अक्षय वाडकरने 45 धावा केल्या. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने 3 विकेट घेतल्या तर चेतन सकरिया आणि कमलेश मकवान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
सौराष्ट्र याआधी रणजी ट्रॉफीत दोनवेळा अंतिम सामन्यात पोहचली आहे. ते पहिल्यांदा विजेता बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. तर सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी विदर्भ खेळत आहे. गेल्या वर्षी विदर्भाने दिल्लीला हरवून पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली होती.