Home /News /sport /

Tokyo Olympic : वडिलांचं निधन, हात फ्रॅक्चर, नैराश्यावर मात करत तेजिंदरपालला ऑलिम्पिकचं तिकीट

Tokyo Olympic : वडिलांचं निधन, हात फ्रॅक्चर, नैराश्यावर मात करत तेजिंदरपालला ऑलिम्पिकचं तिकीट

भारताचा शॉटपूटर तेजिंदरपाल सिंग तूर (Tejinder Singh Toor) टोकयो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) पात्र ठरला आहे.

नवी दिल्ली, 4 जुलै: भारताचा शॉटपूटर तेजिंदरपाल सिंग तूर (Tejinder Singh Toor) टोकयो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) पात्र ठरला आहे. 21 जून रोजी त्याने इंडियन ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रम स्थापित केला होता. तेजिंदरने इंडियन ग्रा. प्री. अॅथलेटिक्समध्ये 21.49 मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या (21.10 मीटर) निकषांची पूर्तता केली. ही कामगिरी करत तेजिंदरने 2019 मधील स्वत:चाच 20.92 मीटरचा विक्रम मोडीत काढला. यानंतर पटियालामध्ये झालेल्या इंटर स्टेट एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Inter state Athletics Championship)  21.10 मीटर अंतरावर गोळा फेकून त्याने कामगिरी कायम ठेवली. आगामी होऊ घातलेल्या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तेजिंदरला गेल्या काही दिवसांत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तो हिमतीने मैदानात परतला आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. 2018  एशियन गेम्समध्ये (Asian games) तेजिंदरने गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांचं कॅन्सरमुळे (fathers death) निधन झालं. एअरपोर्टहून घरी जाताना तेजिंदरला याबाबत कळलं होतं. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यात फक्त खेळ आणि त्याची आई या दोनच गोष्टी होत्या. त्याने प्रॅक्टिस सुरू ठेवत आणि आईसोबत राहण्यासाठी पटियालामध्ये एक घर घेतलं. रोज ट्रेनिंग झाल्यानंतर तो आईसोबत राहायचा. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तेजिंदर चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि त्याची प्रॅक्टिस थांबली. पहिली लाट ओसरल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यातच प्रॅक्टिस करताना गोळा फेकताना तो घसरून पडला आणि त्याचा तळहात फ्रॅक्चर झाला, तसंच गुडघ्यालाही मार बसला. या घटनेमुळे तेजिंदर काही काळ डिप्रेशनमध्ये गेला होता. तो टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणार नाही, असंही त्याला वाटू लागलं होतं. तेजिंदर मानसिकरित्या खचला होता. मात्र, त्याला त्याचे कोच मोहिंदर सिंह ढिल्लो यांनी समजावलं आणि ट्रेनिंग सुरू ठेवलं. तेजिंदर हात फ्रॅक्चर असूनही रोज जिमला जायचा. कमी वजन उचलायचा. पण त्याच्या कोचला रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे तो पूर्णपणे ठिक होईपर्यंत तो अनेक स्पर्धांपासून दूर राहिला. तसेच त्याची मानसिक स्थिती चांगली राहावी, यासाठी प्रयत्न केले गेले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या फेडरेशन कपमध्ये तेजिंदर पुन्हा मैदानात परतला आणि पहिल्याच टूर्नामेंटमध्ये त्याने 19.49 मीटर अंतरावर थ्रो फेकला. त्यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी सुधारत राहिली आणि जून महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत तो क्वालिफाय झाला. वडिलांच्या निधनानंतर तेजिंदरची आईच त्याच्यासाठी सर्वकाही आहे. या कठीण काळातून जाताना त्याला नेहमीच आईची चिंता लागून राहते. ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय केल्यानंतर त्याने सर्वात आधी आईला ही बातमी दिली होती.
First published:

Tags: Olympic, Olympics 2021, Sports

पुढील बातम्या