• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympic वर कोरोनाचं सावट; स्पर्धा आयोजनावर प्रश्नचिन्ह कायम

Tokyo Olympic वर कोरोनाचं सावट; स्पर्धा आयोजनावर प्रश्नचिन्ह कायम

कोरोनाची दुसरी लाट आणि जपानमध्ये उद्भवलेली परिस्थिती बघता अगदी 3 महिन्यांवर असलेल्या आणि 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेवर (Tokyo Olympic) अनिश्चिततेचे सावट आहे.

 • Share this:
  टोकयो, 8 मे : कोरोनाची दुसरी लाट आणि जपानमध्ये उद्भवलेली परिस्थिती बघता अगदी 3 महिन्यांवर असलेल्या आणि 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेवर (Tokyo Olympic) अनिश्चिततेचे सावट आहे. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मागील वर्षी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, यावर्षी पुढे ढकलेल्या या कार्यक्रमापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपानच्या संघटनेने असं स्पष्ट केलं आहे, की आता ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलता येणार नाहीत, त्या रद्दच कराव्या लागतील, याशिवाय अन्य कोणाताही पर्याय नसेल. जपानच्या अधिकाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक अवघड बनली आहे, कारण ऑलिम्पिकचे आयोजन होणार हे गृहित धरुन त्याच्या नियोजनासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा हा दर 4 वर्षांनी आयोजित केला जाणारा एक उत्सव आहे. परदेशी प्रेक्षकांना या स्पर्धांसाठी यंदा अनुमती न मिळण्याची शक्यता असून, हा कार्यक्रम बंदिस्त तसेच केवळ संयोजक, खेळाडू, प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षकांसाठी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्याची स्थिती पाहता, नक्कीच ऑलिम्पिक अशा प्रकारे होऊ शकते. याशिवाय बहुतेक जपानी नागरिक ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब किंवा रद्द करण्याच्या बाजूने आहेत. क्योडो न्यूजच्या मतदान चाचणीनुसार, एकूण लोकसंख्येपैकी 39.2 टक्के लोकांना या स्पर्धा रद्द कराव्यात असे वाटते, तर 32.8 टक्के लोकांना या स्पर्धा तहकूब कराव्यात असे वाटते. 24.5 टक्के लोकांना या स्पर्धा नियोजनानुसार व्हाव्यात असं वाटतं. जपानने जगातील बहुतेक देशांच्या तुलनेत विषाणूचा चांगल्याप्रकारे सामना केला होता, परंतु, गेल्या 2 महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने, समस्यांमध्ये भर पडली आहे. गुरुवारी जपानमधील टोकयोत 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच देशातील आपत्कालीन स्थितीत साप्ताहिक सरासरी संख्या 737 आहे. त्यामुळे जपान सरकारने आणीबाणीची मुदत 31 मेपर्यंत वाढवली आहे. लसीच्या अभावामुळे काळजी वाढली जपानमध्ये कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या असल्या तरी तेथील लोकांच्या लसीकरणाबाबत कमालीची उदासीनता दिसून आली आहे. अवघ्या 2 टक्के जपानी नागरिकांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत 34,89,719 डोस देण्यात आले आहेत. प्रत्येक 100 नागरिकांच्या तुलनेत केवळ 2.8 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करतानाच सापडले कोरोना बाधित ऑलिम्पिक टॉर्च रिले म्हणजेच ज्योत प्रज्वलित करण्यादरम्यान आतापर्यंत 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एप्रिलमध्ये यातील 2 जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं तर उर्वरित 6 केसेसची नोंद मे महिन्यात झाली. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकने परिचारिकांना कार्यक्रमासाठी मेडिकल सेटअप साठी मदतीची विनंती केली परंतु, वैद्यकीय विभागातील लोक यासाठी नाखूष आहेत. देशातील कोरोनाची स्थिती बघता आणि आपत्कालीन स्थितीत अनेक रुग्ण उपचार घेत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. त्यामुळे ऑलिम्पिकची ही मागणी असंवेदनशील असल्याचं म्हटलं जात आहे. मध्य जपानमधील नागोया येथील नर्स मिकीटो इकेदा यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले की, हे सर्व संताप व्यक्त करण्याच्या पलिकडे आहे. ही असंवदेनशीलता पाहून मी अवाक झाले. हे लोक मानवी जीवनाला एवढं कमी कसं समजू शकतात. जपान फेडरेशन ऑफ मेडिकल वर्कर्स युनियन्सच्या निवेदनात महासचिव सुसुमु मोरिता म्हणाले की, आम्ही ऑलिम्पिकवर नव्हे तर महामारीच्या संकटावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. ज्या नर्सेस कोरोनाविरुध्द लढत आहेत, त्या ऑलिम्पिक स्वयंसेवक म्हणजेच नर्सना असे प्रस्ताव देऊ नयेत. रुग्ण आणि नर्सेस यांच्या आरोग्य आणि जीवनासाठी ही जोखीम ठरु शकते, मात्र तरीही ऑलिम्पिक आमच्याकडे, असा पाठपुरावा करीत असल्याने मला विलक्षण चीड आली असल्याचे मोरिता म्हणाले. ठिकाणावरील उपाययोजना स्थानिक लोकांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, त्यांचा बचाव व्हावा यासाठी यापूर्वीच ऑलिम्पिकमध्ये परदेशी चाहत्यांना सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खेळाडू, प्रशिक्षक, पत्रकार आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी देखील प्रवेश मर्यादित असणार आहे. जपानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली असून, काही खेळांनंतर दररोज खेळाडूंची चाचणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांप्रमाणेच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या नॉन-अॅथलिट्सही जपानी नागरिकांच्या थेट संपर्कात येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. आशिया-ओशियाना ऑलिम्पिक आणि पॅरालम्पिक पात्रतेसाठी रेगाटाकरिता रोव्हर्स सध्या टोकयो मध्ये आहेत. दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने हॉंगकॉंग मधील रोव्हर्सला नुकतेच गाठले. 1 मे रोजी नरिता विमानतळावर आगमन झाल्यानंतर खेळाडूंसह अन्य प्रवाश्यांची 2 तासांत आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यानंतर उच्च जोखीम आणि कमी जोखीम अशी वर्गवारी असलेल्या देशांनुसार त्यांचे गट करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका स्टेशनमध्ये नेण्यात आले, तेथे त्यांचे चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मान्यता देण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचा मागोवा घेता यावा, यासाठी त्यांना फोनमध्ये ट्रॅकिंग अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाश्यांची कोरोनासाठी आणखी एक रॅपिड टेस्ट करण्यात आली. चाचणीच्या अहवाल प्रतिक्षेनंतर ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, त्यांना रंगीत कार्ड देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना जपानमध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली. हॉंगकॉंग संघाला ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अडीच तास लागले, तर उच्च जोखीम असलेल्या भारतातील संघाला यासाठी सुमारे 5 तास लागले. त्यानंतर या खेळाडूंना विशेष बसने हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला स्वतंत्र खोली देण्यात आली. या खेळाडूंना केवळ जेवण्यासाठी आणि स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. जेवणाच्या वेळी जेवणाच्या ठिकाणी संघातील 19 जणांपैकी एका वेळी फक्त 4 ते 5 जणांना परवानगी दिली जात आहे. जेवणाच्या ठिकाणी टीम च्या सदस्यांना एकाच टेबलवर परंतु, एकमेकांपासून स्वतंत्र बसवले जाते, जेणेकरून अन्य देशातील खेळाडूंशी त्यांचा संपर्क टाळला जावा. हॉंगकॉंगचे हेड रोईंग कोच ख्रिस पेरी म्हणाले की, हे एका तुरुंगासारखे आहे. यात फारशी मजा येत नाही. तसेच ही स्थिती फारच दयनीय आहे. हॉटेलमध्येही प्रशिक्षक आणि खेळाडू एकमेकांच्या खोलीत जाऊ शकत नाहीत. आम्ही एकमेकांना पाहू शकत नाही, तसेच संवादही साधू शकत नाही. पण मला आयोजकांना याचं श्रेय द्यायचं आहे. त्यांचे स्टॅण्डर्डस खूपच उच्च आहेत. त्यांचा दयाळूपणा पाहून तुम्हाला पुन्हा जपानला नक्की यावसं वाटेल. आयोजकांची कामगिरी उत्तम आहे. ते थोडेसे कठोर आहेत, मात्र कोणत्याही गोष्टी करण्यात लवचिकता आहे. त्यामुळे मला असे वाटते की, आम्ही आता येथे स्थिरावलो आहे.
  Published by:Shreyas
  First published: