मुंबई, 6 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ब्रिटन विरुद्ध ब्रॉन्झ मेडलच्या लढतीमध्ये त्यांचा अगदी निसटता पराभव झाला. संपूर्ण मॅचमध्ये भारतीय टीमनं लढाऊ खेळ करत संपूर्ण देशाची मनं जिंकली आहेत. ब्रिटनकडून पराभूत होऊनही संपूर्ण देशानं महिला टीमच्या खेळाची प्रशंसा केली आहे. बॉलिवूड सुपरस्टार आणि 'चक दे! इंडिया' या महिला हॉकी टीमवरील सिनेमातील कोच कबीर खान म्हणजेच शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पराभावानंतर निराश झालेल्या टीमचा उत्साह वाढवणारं ट्विट केलं आहे.
भारतीय पुरुष टीमनं गुरुवारी ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर शुक्रवारी सकाळी सर्व देशाचं लक्ष महिला टीमच्या कामगिरीकडं होतं. महिला टीमला मेडलनं निसटती हुलकावणी दिली. या पराभवामुळे अनेक खेळाडू इमोशनल झाल्या होत्या. त्यांच्या खेळाबद्दल शाहरुख खाननं प्रशंसा केली आहे.
'मन निराश झालं. पण तुम्ही सर्वांनी आमची मान उंचावली आहे. भारतीय महिला हॉकी टीमनं चांगला खेळ केला. तुम्ही सर्वांनी देशातील प्रत्येकाला प्रेरणा दिली आहे. हाच विजय आहे.' असं ट्विट शाहरुखनं केलं आहे.
Heartbreak!!! But all reasons to hold our heads high. Well played Indian Women’s Hockey Team. You all inspired everyone in India. That itself is a victory.
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 6, 2021
मोठी बातमी! लियोनेल मेस्सीचा बार्सिलोनाला रामराम, 21 वर्षांच्या नात्याचा शेवट
भारतीय महिला टीमची ही तिसरीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. 2016 साली ही टीम 12 व्या नंबरवर होती. त्यापूर्वी 1980 साली भारतीय टीमनं चौथा क्रमांक पटकावला होता. मात्र त्यावेळी सेमी फायनलच्या लढती नव्हत्या. त्यामुळे भारतीय महिलांचे ऑलिम्पिक इतिहासातील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनानं भारताचा 2-1 नं पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021, Shah Rukh Khan