नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : सध्या जपानमध्ये (Japan) सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची एकूण कामगिरी पाहता, त्यात महिला खेळाडूंनी चांगलं यश मिळवलं आहे. या क्षणी भारतीयांना महिला हॉकी टीमकडून (Indian Women’s Hockey Team) पदकाची अपेक्षा आहे. कारण महिला हॉकी टिम आता पदकापासून केवळ दोन पावलांवर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज (4 ऑगस्ट) दुपारी 3.30 वाजता होत असलेल्या हॉकी सेमीफायनलमध्ये (Semi-final) भारतीय महिला हॉकी टिमचा सामना अर्जेंटिनाशी (Argentina) होत आहे. या सामन्यामध्ये क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे ते टिमची कर्णधार राणी रामपालकडे (Captain Rani Rampal). जाणून घ्या राणी रामपालचं क्रीडा क्षेत्रातील नेमकं योगदान काय आहे? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?
राणी रामपालच्या संघर्षमय प्रवासाचं सविस्तर वृत्त आज तकने दिलं आहे. भारतीय हॉकी टिमची कर्णधार राणी रामपाल उत्तम फॉरवर्ड खेळाडू आहे. ऑलिम्पिक 2020 मध्ये हॉकीच्या क्वार्टर फायनल सामन्यात (Quarter Final) भारतीय हॉकी टिमने तीन वेळा अजिंक्य ठरलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला 1-0 ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता प्रथमच भारतीय महिला हॉकी टिमने ऑलिम्पिकमधील अंतिम 4 संघांच्या यादीत स्थान पटकावलं आहे.
हरियाणातील (Haryana) कुरक्षेत्रमधील शाहबाद येथील रहिवासी असलेली राणी रामपाल ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी टिम मधील खेळाडू. अशियाई खेळांमध्ये तिने 2 वेळा पदक जिंकलं आहे.
वडिलांनी समाजाची पर्वा न करता आपल्या मुलीला हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, यामुळे राणी आपल्या नावापुढे वडिल रामपाल यांचं नाव लावते. अर्थात हा निर्णय तिने स्वतः घेतला आहे. राणी लहानपणापासून जिद्दी, हिंमती आणि मेहनती मुलगी आहे. जेव्हा घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली तेव्हा ती फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करू इच्छिते असं तिच्या आईने सांगितल्याचं, तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं.
भारतीय हॉकी टिमच्या कर्णधारपदापर्यंतचा प्रवास राणीसाठी नक्कीच सोपा नव्हता. गरीब कुटुंबात जन्मलेल्या राणीला लहानपणापासून हॉकी खेळण्यापासून समाजाकडून परावृत्त करण्यात आलं. आपल्या समाजात (Society) मुली हाफ पँट आणि टी-शर्ट परिधान करुन खेळू शकत नाही, असं सांगून तिच्या आई-वडिलांवर दबाव आणण्यात आला होता. परंतु, राणीचा आत्मविश्वास आणि पालकांचा तिच्यावर असलेला विश्वास यामुळेच ती आज भारतीय हॉकी टिमचं नेतृत्व करत आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी राणी रामपालच्या वडिलांना समाजाकडून हीन वागणूक, सामाजिक बहिष्कार, धमक्या मिळत होत्या. त्यावेळी त्यांनी समाजातील नेत्यांचं म्हणणं ऐकलं असतं, तर आज राणी एक खेळाडू म्हणून यशस्वी ठरली नसती. मात्र मुलीवरील विश्वास, समाजाविरोधात जाण्याच्या क्षमतेमुळे तसंच रामपाल आणि त्यांची पत्नी राममूर्ती यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे राणी आज हॉकी टिमची कर्णधार आहे.
राणीचे वडील रामपाल हे घोडागाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. मात्र यामुळे त्यांनी राणीला आहार, प्रॅक्टिस यामध्ये कधीही कमतरता जाणवू दिली नाही. राणीची आई तिला दररोज पहाटे 4 वाजता मैदानावर प्रॅक्टिसला सोडायची. त्यांचा हा दिनक्रम कित्येक वर्ष सुरू होता. जेव्हा राणी भारतीय ज्युनियर हॉकी टिममध्ये खेळू लागली, तेव्हा ही मुलगी हरियाणाचं नाव उज्ज्वल करणार याची खात्री तिच्या पालकांना वाटू लागली. आज राणीचं घर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बक्षिसांनी भरलेलं आहे.
आज अर्जेंटिनाविरुध्द होणाऱ्या सेमीफायनल सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सध्या अर्जेंटिना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या, तर भारत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाशी सामना करताना भारतीयांचं लक्ष कर्णधार म्हणून राणीच्या खेळाकडे असेल. हॉकीच्या क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर राणीचं गाव असलेल्या शाहाबाद (Shahabad) परिसरात आनंदाचं वातावरण आहे. राणीच्या घरी तिच्या कुटुंबियांचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची रिघ लागली आहे. आजच्या सामन्यातही भारतीय हॉकी टिम आणि राणीने चांगली कामगिरी करावी, यासाठी लोक प्रार्थना देखील करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021