टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल पटकावलं आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो 87 मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकुब वैडेलीचचा थ्रो 86.67 मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो 85.44 मीटर एवढा गेला, त्यामुळे त्यांना अनुक्रमे सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं.
भालाफेक स्पर्धेच्या या फायनलमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही (Arshad Nadeem) होता, पण नदीम फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला. नदीमचा सर्वोत्तम थ्रो 84.62 मीटर एवढा होता. या सामन्यानंतर नदीम याने खिलाडूवृत्ती दाखवत मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. 'गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल माझा आयडल नीरज चोप्राचं अभिनंदन. मला विजय मिळाला नाही, त्याबद्दल पाकिस्तानची मी माफी मागतो,' असं ट्वीट अर्शदने केलं आहे.
Congratulations to my Idol #NeerajChopra for winning Sorry Pakistan I could not win for you.#ArshadNadeem
— Arshad Nadeem (@ArshadNadeemPak) August 7, 2021
नीरज आणि अर्शद यांनी आपल्या प्राथमिक फेरीत आपआपल्या गटात चांगली कामगिरी केली होती. नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. तर अर्शद 85.16 मीटर भाला फेक करत तिसऱ्या क्रमांकांवर होता. नीरज ग्रुप एमध्ये आणि अर्शद ग्रुप बीमध्ये होता.
नीरजला पाहून भालाफेकीत आला अर्शद
अर्शदला क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं. पण नीरजचा खेळ पाहून त्यानं भालाफेकीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर अर्शदनंच याचा खुलासा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021