नवी दिल्ली, 27 मे : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणात (Sagar Dhankhar Murder case) आता मोठा पुरावा हाती लागला आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) याच्यावरील गुन्हा सिद्ध करणारा एक मोठा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांच्या हाती एक व्हिडीओ फुटेज हाती लागलं असून हा फोटा त्या व्हिडीओतील आहे.
हा फोटो छात्रसाल स्टेडियमचा आहे. येथे सुशील कुमार हा सागर धनकढ, सोनू महाल आणि त्यांच्या साथीदारांना काठीने मारहाण करता दिसत आहे. पोलिसांकडे या घटनेचा 19 ते 20 सेकंदाचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित प्रिन्स जो सुशील कुमारचा जवळचा आहे त्याकडून मिळाला आहे. प्रिन्सवरदेखील अनेक गुन्हे दाखल आहेत.
काय आहे प्रकरण?
सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मे रोजी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण झाली, असा दावा दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या घटनेच्या फुटेजवरूनही हे स्पष्ट झाले आहे. सुशील कुमारही या मारहाणीच्या दरम्यान उपस्थित होता, असे फुटेजमध्ये दिसत होते.
सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते असंही समोर येत आहे. या मारहाणीनंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारनं या प्रकरणी कोर्टात धावही घेतली. पण त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा-Sagar Dhankhar Murder : सुशील कुमारचे महिला खेळाडूशी कनेक्शन उघड
काय म्हणाला सुशील कुमार?
सागर धनकर हत्या प्रकरणात दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला रविवारी अटक करण्यात आली. आता दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये सुशील कुमारने सर्व आरोप फेटाळले आहेत. 'मी निर्दोष आहे. माझी दिशाभूल करण्यात आली. मला लोकांनी लपण्याचा सल्ला दिला होता, ' असा दावा सुशील कुमारने केला आहे. त्याचबरोबर मी कुणाची हत्या का करु? असा प्रश्नही त्याने विचारला. त्याचबरोबर माझे कोणत्याही गँगस्टरळी संबंध नसल्याचा दावा सुशीलने केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशीलच्या या दाव्यात काही तथ्य आहे का? की त्याने तपासाची दिशाभूल करण्यासाठी हा दावा केला आहे, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news