मुंबई, 18 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) इंग्लंडला रवाना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. पण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमला तब्बल 24 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यातले 14 दिवस मुंबईमध्ये तर उरलेले 10 दिवस इंग्लंडच्या साऊथम्पटनमधले असतील. 2 जूनला भारतीय टीम चार्टर्ड विमानाने मुंबईवरून लंडनला रवाना होणार आहे.
बीसीसीआयच्या प्लाननुसार मुंबईत राहणारे खेळाडू सोडून इतर खेळाडू बुधवारी मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन होतील. यामध्ये सपोर्ट स्टाफचे सदस्य आणि कोच यांचाही समावेश असेल. टीमच्या सगळ्या सदस्यांना मुंबईत आणण्यासाठीही चार्टर विमानाची सोय करण्यात आली आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 24 मे रोजी मुंबईत राहणारे टीमचे सदस्य बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. यामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा (Rohit Sharma) याशिवाय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा समावेश आहे. या सगळ्यांना हॉटेलमध्ये 7 दिवस क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली, पण त्यांना घरामध्ये मात्र क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेलं बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) मुंबईमध्ये यायच्या आधीच खेळाडूंच्या तीन कोरोना टेस्ट केल्या आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच खेळाडूंना मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हायला परवानगी असेल.
भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यात पहिले साऊथम्पटनमध्ये पोहोचेल, इकडेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. साऊथम्पटनच्या मैदानातच हॉटेल असल्यामुळे खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन कालावधीमध्येही सराव करता येईल.
कोरोना व्हायरसचा भारतात सापडलेला नवा व्हेरियंट जास्त धोकादायक आहे, लसीकरणाशिवाय हा व्हायरस लोकांमध्ये जलद गतीने पसरत आहे, असं ब्रिटनच्या आरोग्य मंत्री मॅट हेनकॉक यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट B.1.617.2 भारतातच पहिल्यांदा सापडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, England, Team india