टीम इंडियाचे क्रिकेटपटू घेणार फक्त याच कंपनीची लस, जाणून घ्या कारण

टीम इंडियाचे क्रिकेटपटू घेणार फक्त याच कंपनीची लस, जाणून घ्या कारण

आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यामुळे भारतीय खेळाडू आता स्वत:च्या घरी गेले आहेत. पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आधी टीम इंडियाचे क्रिकेटपटू घरी विश्रांती घेतील. इंग्लंडला जायच्या आधी भारतीय क्रिकेटपटू कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतील, असंही सांगितलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यंदाचा आयपीएलचा मोसम (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्थगित झाल्यामुळे भारतीय खेळाडू आता स्वत:च्या घरी गेले आहेत. पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आधी टीम इंडियाचे क्रिकेटपटू घरी विश्रांती घेतील. इंग्लंडला जायच्या आधी भारतीय क्रिकेटपटू कोरोनाची लस घेतील, असंही सांगितलं जात आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचे क्रिकेटपटू कोविशिल्ड (CoviShield) लस घेणार आहेत. भारतामध्ये 1 मेपासून सरकारने 18 वर्षांपुढच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे, त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू आता लस घेऊ शकतात. भारतीय खेळाडूंना आयपीएल सुरू असतानाच लस दिली जाईल, असं बोललं जात होतं, पण आयपीएल रद्द झाल्यामुळे आता खेळाडूंना केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी भारतीय क्रिकेटपटूंचं लसीकरण करण्याची बीसीसीआयची योजना आहे का? असा सवाल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) विचारण्यात आला, तेव्हा त्याने 'आता खेळाडूंकडे लस घ्यायला वेळ आहे, कारण राज्य सरकार लसीकरण करत आहे. सगळे खेळाडू स्वत:च्या घरी गेले आहेत, त्यामुळे हाच सोपा आणि योग्य मार्ग आहे,' असं सांगितलं.

टीम इंडियाच्या खेळाडूंना कोविशिल्ड लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे खेळाडू इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार आहेत, त्यांनाच कोविशिल्ड घ्यायला सांगण्यात आलं आहे. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळल्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत इंग्लंडमध्येच असेल. जर भारतीय खेळाडूंनी इकडे कोविशिल्डचा पहिला डोस घेतला तर त्यांना भारतातच दुसरा डोस घेता येणार नाही, पण कोविशिल्डचा दुसरा डोस त्यांना इंग्लंडमध्ये मिळू शकतो, कारण ही लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या कंपनीची आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार खेळाडूंनी कोविशिल्ड लस घ्यावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे, कारण एस्ट्राजेनेकाने बनवलेल्या लशीचा दुसरा डोस खेळाडूंना इंग्लंडमध्ये मिळू शकेल.

कोविड-19 च्या गाईडलाईन्सनुसार कोरोना व्हायरसच्या कोणत्याही लशीचे दोन डोस घेणं बंधनकारक आहे. जर एखाद्याने कोरोनाचा पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला तर त्याला दुसरा डोसही कोव्हॅक्सिनचाच घ्यावा लागणार आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू कोविशिल्ड लस घेणार आहेत. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम जवळपास 4 महिने राहणार आहे, त्यामुळे त्यांना तिकडे कोविशिल्डचा दुसरा डोस घेणं सोपं जाईल.

Published by: Shreyas
First published: May 7, 2021, 4:02 PM IST

ताज्या बातम्या