टीम इंडियाचे 'हे' धुरंधर 2020 मध्ये निवृत्तीच्या वाटेवर!

टीम इंडियाचे 'हे' धुरंधर 2020 मध्ये निवृत्तीच्या वाटेवर!

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2019 मध्ये निवृत्ती घेतली. आता नव्या वर्षात भारताचे आणखी काही खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहेत.

  • Share this:

भारताच्या क्रिकेट संघासाठी 2019 हे वर्ष जबरदस्त असंच राहिलं आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभव वगळता वर्षभर भारतीय क्रिकेट संघाने दबदबा राखला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये भारताच्याच गोलंदाज आणि फंलदाजांचे वर्चस्व आहे. सध्या भारतीय संघ नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानात उतरत आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघबांधणी सुरू असताना काही खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहेत. यामध्ये दिग्गजांचा समावेश आहे. सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या या खेळाडूंच्या पुनरागमनाची वाट खडतर असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

वर्ल्ड कपवेळी भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने निवृत्ती जाहीर केली. त्याचवेळी अंबाती रायडुनेही तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती. यावरून वादही निर्माण झाला होता. फिटनेस आणि कामगिरीत सातत्य नसल्यानं खेळाडूंना संघात स्थान टिकवणं कठिण जातं. त्यातही आता झटपट क्रिकेटच्या जमान्यात फॉर्म महत्वाचा ठरतो.

महेंद्रसिंग धोनी

नव्या वर्षात भारताचा कोणता क्रिकेटपटू निवृत्ती जाहीर करेल असं म्हटलं तर सध्या धोनीच्याच नावाची चर्चा आहे. धोनी वर्ल्ड कपनंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नसल्याने तो काय करणार याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. धोनीचे वय सध्या 38 वर्षांचा आहे. याआधी त्याने कर्णधारपद सोडण्याचा आणि कसोटीतून निवृत्तीचा निर्णय अचानक जाहीर केला होता. त्यामुळे आताही तो असा अनपेक्षित धक्का देऊ शकतो. याबाबत जानेवारीत बोलू असं धोनीने म्हटलं होतं.

रविचंद्रन अश्विन

धोनीशिवाय भारताच्या आणखी एका दिग्गज खेळाडूचे नाव यामध्ये चर्चेत आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या संघात नाही. 2010 ला भारतीय संघात आलेल्या अश्विनने भारताच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी समर्थपणे पेलली. विशेष म्हणजे गेल्या दशकातील तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाजही राहिला आहे. 2017 मध्ये त्याने शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर तो टी20 तसेच एकदिवसीय संघात दिसलेला नाही. फक्त कसोटीत खेळणारा अश्विन त्यामुळे निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.

सुरेश रैना

आता भारतीय संघातून बाहेर असलेला आणखी एक खेळाडू म्हणजे सुरेश रैना. 2005 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदारर्पण केलेला रैना टी20 मध्ये भारताकडून पहिलं शतक करणारा फलंदाज आहे. 2011 च्या वर्ल्ड कप संघातही तो होता. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे रैनासुद्धा निवृत्तीच्या वाटेवर आहे.

दिनेश कार्तिक

वर्ल्ड कपमध्ये धोनीला दुखापत झाल्यास त्याच्या जागी अनुभवी खेळाडू म्हणून संघात समावेश केलेल्या दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दही ओहोटीला लागली आहे. धोनी यष्टीरक्षक असल्यानं त्याला क्वचितच संघात जागा मिळाली. तसेच दुखापतीनेही त्याला संघातून बाहेर रहावं लागलं. सध्या ऋषभ पंत आणि वृद्धीमान साहाकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असल्यानं कार्तिकचे संघात पुनरागमनाचे दरवाजे बंद झाल्यासारखेच आहे. त्यामुळे तोसुद्धा निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 07:04 AM IST

ताज्या बातम्या