मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. विराटने पत्रकार परिषदेमध्ये मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्मासोबतच्या (Rohit Sharma) वादाच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे. वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेण्यावरही विराटने प्रतिक्रिया दिली. 8 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी आपल्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याची सूचना दिल्याचं विराटने सांगितलं.
रोहित शर्माला 8 डिसेंबरला भारतीय टीमच्या वनडे फॉरमॅटचं नेतृत्व देण्यात आलं. त्याआधी विराटने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितला टी-20 कर्णधार करण्यात आलं होतं. विराटला टेस्टसोबतच वनडे टीमचं नेतृत्वही करायचं होतं. विराटकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मुलाखत दिली होती. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला. गांगुलीच्या या वक्तव्यालाच विराट कोहलीने खोडून काढलं आहे.
टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे. कोहलीच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कॅप्टन्सीच्या वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नेमकं सौरव गांगुली खरं बोलतोय का विराट कोहली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजमधून माघार घेतल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं, पण विराटने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'मी निवडीसाठी उपलब्ध होतो आणि कायमच असेन. मी बीसीसीआयला आराम करण्यासाठी संपर्क केला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजसाठी मी उपलब्ध आहे आणि आधीही होतो,' असं विराट म्हणाला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. रोहितच्य मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही, यानंतर विराटही कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वनडे सीरिजमधून आराम घेईल, असं बोललं जात होतं. टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियातून एकत्र खेळलेले नाहीत.
युएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं, यानंतर कॅप्टन्सी बदलाच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या चर्चांवर विराटने पत्रकार परिषदेत उत्तरं दिली. 'बाहेर ज्या गोष्टी होतात त्या आदर्श नसतात, तसंच तुम्ही अपेक्षा करता तशाही नसतात. तुम्ही एक व्यक्ती म्हणून फक्त तुमच्या हातात असलेल्या गोष्टी नियंत्रित करू शकता. मी पूर्णपणे एकाग्र आणि मानसिकदृष्ट्या तयार आहे,' असं वक्तव्य विराटने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Sourav ganguly, Team india, Virat kohli